पुणे-नगर महामार्गावर कडक नाकाबंदी
शिक्रापूर – संचारबंदी लागू करण्यात आलेली असताना देखील अनेक वाहने रस्त्याने ये-जा करीत असल्याने आता शिक्रापूर पोलिसांनी पुणे- नगर महामार्गावर कडक नाकाबंदी सुरू केली आहे. महामार्गावर अनावश्यक सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
सर्वत्र संचार बंदी असताना तसेच शासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवीत असताना देखील नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे आढळून येत आहे. अनेक ठिकाणी नागरिक वेगवेगळे कारण पुढे करून बिनधास्त रस्त्याने प्रवास करत आहेत. काही ठिकाणी नागरिक गावी जाण्याचे देखील प्रकार घडत आहेत, त्यामुळे नागरिकांचे स्थलांतरण तसेच विनाकारण घराबाहेर पडणे आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहे. पुणे-नगर महामार्गावरील महत्त्वाच्या असलेल्या शिक्रापूर या ठिकाणी नागरिकांच्या वाहनांची जास्त वर्दळ होत असल्याने पोलिसांनी येथे मोठी नाकाबंदी लावली असून त्या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या सर्वच वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे.विनाकारण फिरणाऱ्या वाहनांना परत पाठविले जात आहेत.
- शिक्रापूर येथे नाकाबंदी करून वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे मात्र, यामध्ये अनेक नागरिक मेडिकलचे जुने, नवे प्रमाणपत्र, डॉक्टरांचे कागद घेऊन घराबाहेर पडत असून एका व्यक्तींबरोबर तीन-तीन व्यक्ती बाहेर पडल्याचे समोर आले आहे; मात्र आम्ही अनेक वाहन चालकांना पुन्हा मागे पाठविले असून यापेक्षा देखील मोठी नाकाबंदी लावणार आहे.
– राजेश माळी, उपनिरीक्षक, शिक्रापूर पोलीस ठाणे