मुंबई, – विकास फाटक ऊर्फ “हिंदुस्थानी भाऊ’ याच्या पोलीस कोठडीत एक दिवसाने वाढ करण्यात आली आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना भडकवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी इकरार खानला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
“दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घ्या; या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊने भडवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याला मुंबईच्या धारावी पोलिसांनी अटक केली. त्याला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एक दिवसाने त्याच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थांची जबाबदारी मी का घेऊ? असा सवाल हिंदुस्थानी भाऊने केला होता. विद्यार्थी आंदोलन करतायत ही जबाबदारी राज्य सरकारची आहे, असेही त्याने सांगितले होते. गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीचे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये होते. अनेकांनी जीव देण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळेच रस्त्यावर उतरून आंदोलन करावे, असे आपण आवाहन केल्याचे त्याने म्हटले होते.