प्रकाश यादव
पिंपरी -कोणतीही आपत्ती आली की राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ)चे पथके मदत कार्यासाठी रवाना केली जातात. मात्र, हे पथक आता सातासमुद्रापार म्हणजे युक्रेनच्या युध्द भूमीवर मदतीसाठी जाण्यास सज्ज झाले आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युध्दामुळे युक्रेनमध्ये मोठी हानी झाली असून अद्यापही युध्द सुरू आहे. रशियाने युक्रेनवर रासायनिक हल्ला केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. असे झाल्यास बचावकार्यासाठी एनडीआरएफचे जवान मदतीला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार सुदुंबरे येथील एनडीआरएफ केंद्रातील दोन पथके सज्ज झाली आहेत.
गृहमंत्रालयाचा आदेश आल्यानंतर ही पथके रवाना होणार असल्याची माहिती एनडीआरएफ सुदुंबरे युनिट येथील कमांडिंग अधिकारी, महाराष्ट्र प्रमुख अनुपम श्रीवास्तव यांनी दै. “प्रभात’शी बोलताना दिली. रशिया आणि युक्रेनमध्ये 24 फेब्रुवारी 2022 रोजी युध्दाला सुरुवात झाली आहे. 17 दिवसानंतरही अद्याप युध्द सुरू आहे. रशियाने जर युक्रेनवर रासायनिक हल्ला केला तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. अशा वेळी भारत सरकार युक्रेनच्या मदतीसाठी एनडीआरएफची पथके मदतीसाठी पाठविण्याची शक्यता आहे. सुदुंबरे येथील एनडीआरएफच्या दोन पथकांना सज्ज राहण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्या आहेत. या दोन पथकांमध्ये 2 अधिकारी, 2 इन्स्पेक्टर आणि 91 जवान असणार आहेत.
देशात एनडीआरएफची स्थापना 2005 च्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार 2006 साली करण्यात आली. एनडीआरएफ हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येते. एनडीआरएफचे घोषवाक्य आपदा सेवा सदैव असे आहे. या घोषवाक्याचा अर्थ आपत्तीच्या वेळी सदैव सेवा हीच प्राथमिकता असा होतो. या घोषवाक्यानुसार देशात कोणत्याही प्रकारची आपत्ती आली की सर्व प्रथम एनडीआरएफचे पथके मदत कार्यासाठी रवाना केली जातात. आता हेच पथक युक्रेनच्या मदतीला जाण्यासाठी सज्ज झाले आहे.
ही पथके रासायनिक हल्ल्यावेळी नागरिकांना बाहेर काढणे, रासायनिक संक्रमण कमी करण्याचे काम करणार आहे. यासाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन जाण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सुचनेनुसार 2 अधिकारी, 2 इन्स्पेक्टर आणि 91 जवान असे 95 जणांची दोन पथके सज्ज ठेवण्यात आले आहेत. गृहमंत्रालयाच्या सूचना आल्यानंतरच ही पथके हवाई मार्गे रवाना होणार आहेत.
– अनुपम श्रीवास्तव, कमांडिंग अधिकारी,महाराष्ट्र प्रमुख,एनडीआरएफ