डॉ. मेघश्री दळवी ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आपण अनुभवत असताना जागतिक तापमानाची वाढ कशी रोखता येईल या दृष्टीने सगळीकडे प्रयत्न सुरू आहेत. पण ही वॉर्मिंगची म्हणजे ऊबदार होत जाण्याची प्रक्रिया आपण उलटवू शकू का? तिला ग्लोबल कूलिंगच्या प्रक्रियेने टक्कर देऊ शकू का? याचा विचारही आता गंभीरपणे होताना दिसत आहे. जिओइंजिनिअरिंग या शास्त्रशाखेत भूपृष्ठ आणि वातावरण यात विचारपूर्वक चांगले बदल घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होतो. सूर्याकडून येणाऱ्या प्रखर विकिरणांना थोड्या प्रमाणात आळा घालून ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम कमी करणे हे एक उद्दिष्ट त्यात असतं. अर्थात, दाहक सूर्यकिरणं रोखणं ही कल्पना सोपी असली तरी ती प्रत्यक्षात आणणं मात्र कठीण आहे. एकीकडे आपल्याला प्रकाश, सौरऊर्जा, वनस्पतींचं प्रकाशसंश्लेषण यासाठी ही किरणं आवश्यक असतात. तर दुसरीकडे पावसाचं चक्र सुरळीत राहावं म्हणूनही पुरेशा प्रमाणात सूर्याची उष्णता जरुरी असते. त्यामुळे जिओइंजिनिअरिंगचे प्रयोग करताना अत्यंत काटेकोरपणे समतोल राखावा लागतो. महासागरांमधलं क्षारयुक्त पाणी उंचावर फवारलं तर ढगांची घनता वाढून किरणं अडवली जातात. वातावरणाच्या उंचातल्या थरात सिलिकेट्स शिंपडणे हाही प्रयोग करून झाला आहे. वातावरणात उंचावर धुळीचे सूक्ष्म कण उडवूनदेखील असाच परिणाम मिळेल ही कल्पना आता जोर धरते आहे. असे सूक्ष्म कण वातावरणात असतील तर पृथ्वीचं तापमान काही काळासाठी किंचित घटतं. ज्वालामुखीतून उडालेल्या राखेने असा अनुभव 1991 मध्ये दिला आहे. पण काही मोजक्या नैसर्गिक उदाहरणांवरून अंदाज बांधताना योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक आहे. या सगळ्या प्रयोगांना “ग्लोबल कूलिंग’ असं नाव दिलं असलं तरी, त्यातून तापमान नक्की घटेल का, याबाबत शास्त्रज्ञांच्या आणि पर्यावरण तज्ज्ञांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. लहान प्रमाणावर असे प्रयोग सुरक्षित वाटले तरी मोठ्या प्रमाणात करताना बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागेल. हवामानाचा अंदाज आपल्याला अजूनही अचूकपणे मांडता येत नाही. तेव्हा या प्रयोगांचा प्रभाव महासागरांमधले प्रवाह, वाऱ्यांचे प्रवाह, पावसाचं प्रमाण, ओझोन थर अशा वेगवेगळ्या बाबींवर कसा पडेल याविषयी पूर्ण अभ्यास करावा लागेल. त्यांची निरनिराळी मॉडेल्स बनवून त्यांची छाननी करावी लागेल. त्या त्या प्रदेशातली जीवनशैली, तिथले स्थानिक रोजगार, भौगोलिक फरक, जैवविविधता, शेती उत्पादनं, राजकीय परिस्थिती यांच्याकडेही योग्य ते लक्ष पुरवावं लागेल. तसंच या बदलांचे दीर्घकालीन परिणाम काय होतील याचा अदमास घ्यावा लागेल. कदाचित पृथ्वीचं तापमान कमी होईल, पण ते सगळीकडे सारख्याच प्रमाणात कमी होईल का? वाळवंटी प्रदेश अधिक उष्ण आणि अधिक रखरखीत होतील का? पावसाचं चक्र बिघडलं तर दुष्काळ वाढतील का? ग्लोबल कूलिंगच्या प्रयोगांमधून अखेरीस काय निष्पन्न होईल यावर अनेक शास्त्रज्ञ आणि पर्यावरण संशोधकांमध्ये चर्चा सुरू आहे.