अरुण गोखले
एका रस्त्यावर चार-पाच कामगार मोठमोठे लाकडाचे ओंडके उचलून ते गाडीत भरण्याचे काम करत होते. त्या कामगारांचा मुकादम त्यांना लवकर काम करा म्हणून जोरजोरात सांगत होता. स्वत: मात्र झाडाच्या सावलीत उभा होता. बिचारी कामगार मंडळी मात्र भरदुपारच्या उन्हात काम करत होती.
एक भला मोठा ओंडका मात्र काही केल्या त्यांना हलता हलत नव्हता. बिचारे कामगार खूप प्रयत्न करत होते. नवनव्या शक्कला लढवीत त्यांनी तो ओंडका कसाबसा त्या गाडीच्या जवळ आणण्यात यश मिळवले होते. पण आता ओंडका उचलून मात्र त्या गाडीत कसा चढवायचा ही खरी कसोटी होती. बरं तिथे त्या चार-पाच लोकांशिवाय अन्य कोणीच मदत करायला पुढे येईल असे नव्हते. खरंतर कामगारांचा मुकादम त्यांना मदत करू शकत होता पण त्याच्या डोक्यावर मी मुकादम, हे नोकर, मी फक्त सांगायचे, या कामगारांनी मात्र पडेल ते कष्ट करून काम करायचं, हे भूत सवार होतं. त्याचा स्वभाव इतरांना मदत करणारा किंवा साधा दुसऱ्याच्या श्रमाची किंमत करणाराही नव्हता. तो फक्त पाहात होता. तोच त्या रस्त्याने एक घोडेस्वार दौडत येताना दिसला.
तो त्या लोकांच्या जवळ आला. ते काय करत आहेत ते पाहू लागला. त्याला त्या कामगाराचे कष्ट, त्यांच्या अंगातून निथळणारा घाम, त्यांची होणारी दमछाक पाहवेना. तो घोडेस्वार घोड्यावरून खाली उतरला. त्याने त्या कामगारांना ओंडका हलवायला, त्याच्या खाली दुसरे लाकूड घालायला, त्याला दोरी बांधून दोघांही तो गाडीत ओढायला तर त्याच्यासकट चौघांनी तो खालून वर ढकलायला मदत केली आणि तो ओंडका त्या गाडीत चढवला. जसे का ते काम पूर्ण झाले. त्या बरोबर तो घोडेस्वार परत निघाला. त्या कामगारांनी त्याचे आभार मानले. त्याला नमस्कार केला. ते स्वत:चा घाम पुसत असतानाच तो जसा आला तसाच निघून गेला. मात्र जाता जाता त्या घोडेस्वाराने आपले ओळख कार्ड त्या मुकादमाच्या हातात दिले. तो म्हणाला, “”पुन्हा जर कधी मदत लागली तर मला बोलवा. मी मदतीला अवश्य येईन.” इतकं बोलून तो घोडेस्वार निघून गेला.
एक घोडेस्वार येतो काय, कामगारांना मदत करतो काय आणि जातो काय! कोण बरं तो असावा? असं म्हणून जेव्हा त्या मुकादमाने ते त्याचे ओळखकार्ड पाहिले आणि त्या मुकादमाला मोठा धक्का बसला. कारण ते कार्ड होते चिफ कमांडर ऑफ आर्मीच्या- जॉर्ज वॉशिंगटन यांचे. जे पुढे अमेरिकेचे प्रथम अध्यक्ष बनले होते. कोणतंच काम हे कधीच लहान नसते हे दाखवून देणारी त्या थोर व्यक्तीची कृती मुकादमाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून गेली.