मुंबई- पंकजा मुंडे या माझ्या भगिनी आहेत. त्यांना भाजपमध्ये खूपच त्रास होत असेल, तर साडीचोळी घेऊन मी त्यांना आणायला जाईन, असे सांगत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपल्या मानलेल्या भगिनी पंकजा मुंडे यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
जानकर पुढे बोलताना म्हणाले की, पंकजा मुंडे या रासपात आल्या तर त्यांचे काय करायचे हे मी निश्चित करेल. पण सध्या त्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत, त्यामुळे सध्या तरी मी त्यांना दिल्या घरी सुखी राहा असेच म्हणेल. मात्र, ज्यावेळेस त्यांना खूपच त्रास होईल तेव्हा मी साडीचोळी घेऊन बहिणीला आणायला जाईल, असे मत जानकर यांनी व्यक्त केले आहे.
कॉंग्रेस, भाजपपासून सावध व्हा आणि प्रादेशिक पक्षाला आपलेसे करा, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
“देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, एकनाथ शिंदे आल्यावर फायदा होईल. आता ते म्हणाले की अजित पवार आल्यावर फायदा होईल. तर परत दोन महिन्यांनी म्हणतील आपला साराच बेस निघून गेला’, असा टोलाही जानकर यांनी यावेळी बोलताना फडणवीसांना लगावला.
एक दिवस रासपचा पंतप्रधान येईल
राष्ट्रीय समाज पार्टीच्या वतीने जानकरांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात “जनसंवाद यात्रा’ काढण्यात येत आहे. जानकर यांनी 2024 ला लोकसभेसाठी 543 मतदारसंघात रासपचे उमेदवार रिंगणात असतील अशी घोषणा केली. मी माझ्या कार्याला चौंडीतून सुरुवात केली. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त सभा घेतल्या. मुंबईला देखील जयंती साजरी केली. आता दिल्लीत जयंती साजरी करत आहोत. दिल्लीत 10 लाख लोक गोळा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एक दिवस रासपचा पंतप्रधान चौंडीला येईल असे भाकितही यावेळी जानकर यांनी व्यक्त केले आहे.