पिंपरी – पुण्याच्या मानाने पिंपरी चिंचवड शहरात पोलीस ठाण्याची संख्या कमी आहे. तरीदेखील झुकते माप देऊन दोन कोटींचा निधी पोलिसांना दिला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. परंतु आज कौतुक करीत असलो तरी भविष्यात शहरातील गुन्हेगारी कमी झाली नाही तर उद्या मी जाहीररित्या टीका-टिप्पणीही करेल, असा सूचक इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला.
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सेवा, एक्स ट्रॅकर उपक्रमाचे लोकार्पण अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
स्कॉटलंड नंतर महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव मानाने घेतले जाते. नागरिक पोलिसांकडे विश्वासाने आले पाहिजेत आणि समाधान घेऊन गेले पाहिजेत. पोलिसांचा वचक जनतेवर नको तर गुन्हेगारांवर हवा, असे मतही अजित पवार यांनी व्यक्त केले.
नागरिक जेंव्हा पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कारणांसाठी येतात तेंव्हा त्यांना योग्य वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी येतात. त्यावर मार्ग काढून पोलिसांच्या कामात तत्परता आणण्यासाठी सेवा उपक्रम राबविला जात आहे. पोलीस ठाण्यात आलेल्या नागरिकांची माहिती ऑनलाइन माध्यमातून घेतली जाईल. ती नियंत्रण कक्षात पाठवली जाईल. नागरिकांना पोलिसांकडून मिळालेल्या सेवेबाबत फॉलोअप नियंत्रण कक्षातून घेतला जाईल. त्यानुसार नागरिकांना मार्गदर्शन आणि पोलिसांच्या सेवेचा दर्जा तपासला जाणार आहे. सराईत गुन्हेगारांवर पिंपरी चिंचवड पोलीस स्मार्ट पद्धतीने लक्ष ठेवणार आहेत. त्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून “एक्स ट्रॅकर’ हे नवीन ऍप्लिकेशन तयार करण्यात आले आहे.