नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या ऐतिहासिक गोंधळ हा पूर्वनियोजित होता असा मोठा गौप्यस्फोट दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडून नियुक्त केलेल्या विशेष तपास यंत्रणेच्या चौकशीतून समोर आला आहे. दिल्ली आणि लाल किल्ल्यावर झालेला गोंधळ आणि हिंसाचाराची स्क्रिप्ट आधीपासूनच तयार होती असा गौप्यस्फोट दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडून नियुक्त केलेल्या विशेष तपास यंत्रणेच्या चौकशीतून करण्यात आला आहे. या माहितीमुळे आता सर्व प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार काही उपद्रव करण्यासाठी काही खास समूहांना लाल किल्ला आणि आयटीओ वर एकत्रित येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या समूहांचा उद्देश गर्दीत सहभागी होऊन उपद्रवाची सुरुवात करणे आणि आंदोलनकर्त्यांना गर्दीचा हिस्सा बनवून हिंसेत सहभागी करणे हा होता, अशी माहिती मिळाली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार इकबाल सिंह नावाच्या एका दंगेखोराने लाल किल्ल्यावर गर्दी जमा केली. त्या गर्दीला भडकावले आणि लाहोर गेट तोडण्यासाठी सांगितले. इकबालच्या सांगण्यावरुन उपद्रवी लोकांनी लाहोर गेट तोडले. दिल्ली पोलिसांनी इकबाल सिंहवर 50 हजार रुपयांचा इनाम ठेवला आहे.
व्हिडिओ तपासल्यानंतर पोलिसांनी तज्ञांच्या मदतीने ही छायाचित्रे काढली आणि प्रसिद्ध केली. यापूर्वी गुन्हे शाखेने 12 दंगेखोरांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 44 एफआयआर नोंदविल्या आहेत, त्यामध्ये सुमारे दीडशे जणांची अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे पोहोचल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांचे विशेष तपास पथक सीसीटीव्ही कॅमेरे, व्हायरल व्हिडिओ, मीडिया कॅमेरे, दिल्ली पोलिसांचे कॅमेरे आणि जनतेच्या आवाहनानंतर पोलिसांना मिळालेल्या सुमारे पाच हजार व्हिडिओंची चौकशी करीत आहे. या तपासानंतर पोलिसांनी या दंगेखोरांना ओळखले. आतापर्यंत त्यांनी 8 दंगेखोरांची माहिती देणाऱ्यांना बक्षीस जाहीर केले आहे.
हिंसाचार संदर्भात गुन्हे शाखेचा तपास अत्यंत सावकाश सुरू आहे. प्रकरण ताब्यात घेतल्यानंतर एसआयटीने आतापर्यंत केवळ दोन लोकांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दीप सिद्धूच्या शोधात पोलिस हरियाणा आणि पंजाबमध्ये तळ ठोकून आहेत. अनेक ठिकाणी छापे टाकूनही पोलिसांना यश मिळत नाही. दीप सिद्धू सतत आपले व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करुन स्पष्टीकरण देत आहे आणि दिल्ली पोलिसांना आव्हान देत आहे. मात्र, प्रत्येकवेळी तो पोलिसांपेक्षा दोन पाऊल पुढे आहे. यामुळेच पोलिसांनी आता जनतेची मदत मागितली असून दीप सिद्धू याच्यासह चार जणांची माहिती देणाऱ्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.