- संभाजी नगरच्या नामकरणावरून शिवसेनेला टोला
पिंपरी – संभाजीनगर नामकरणाबाबत शिवसेनेची सत्ता असल्याने औरंगाबाद महापालिकेत ठराव करावा, कॅबिनेटमध्ये मंजुरी घ्यावी, केंद्राची मदत लागल्यास मी पुढाकार घेईन. मला संभाजीनगरची कृती करून दाखविली तर मी त्यांचे अभिनंदन करेल, अशी खोचक टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असताना केली.
शिवसेनेच्या करणी आणि कथणीत फरक आहे. संभाजीनगरच्या बाबतीत आम्ही काही तडजोड करणार नाही, असे सांगतात. मग महापालिकेत त्यांची सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी महापालिकेत ठराव करावा कॅबिनेटचा निर्णय घ्या, केंद्र सरकारच्या मदतीची आवश्यकता लागल्यास आम्ही पुढाकार घेऊ. केवळ जाहीर करणे, घोषणा करणे यापेक्षा कृतीची आवश्यकता आहे.
संभाजीनगर, असे नामकरणाची कृती करून दाखवावी, असे आव्हानही प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला दिले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अण्णा हजारे यांनी केंद्र सरकार विरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे भाजप नेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरू होती. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली.
हजारे यांनी आंदोलन स्थगित केले. त्यानंतर शिवसेनेच्या मुखपत्रातून अण्णा यांच्या या भूमिकेवर तिरकस भाष्य करण्यात आले. याबाबत दरेकर म्हणाले, “”अण्णांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला मान देऊन आंदोलन मागे घेतले. त्यामुळे राऊतांच्या पोटात दुखले नाही तर कसे चालेल? अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वार्थ साधता आला तर आला, असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या दुर्दैवाने हा स्वार्थ साधता येत नाही.
अधिकाऱ्यांनी चार भिंतीच्या आत बोलावे
भाजप सरकारच्या काळात त्रास झाला, असे वक्तव्य डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. त्याबाबत प्रवीण दरेकर म्हणाले, त्यांच्यासारख्या अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती. राजकारणात सत्ताधारी किंवा विरोधक जाहीररित्या एकमेकांची उणीदुणी काढतात. त्याप्रमाणे प्रशासनातील अधिकाऱ्याने सरकारमधील उणीदुणी बाहेर काढणे शोभा देणारे नाही. अशा प्रकारचे वक्तव्य करणे योग्य नाही. लहाने यांनी चार भिंतींच्या आत बोलायला पाहिजे. लहाने यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता, अशी आठवणही दरेकर यांनी करून दिली.