पिंपरी – एचए कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कामगारांच्या थकीत देण्यांबाबत निर्णय न झाल्याने संतप्त कामगारांनी सोमवारी (दि.1) पुन्हा एकदा कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. कंपनी व्यवस्थापनाशी भेट घडवून आणण्यासाठी मध्यस्थी करण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिल्याने, हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
केंद्र सरकारचा देशातील पहिला सार्वजनिक उपक्रम असलेल्या हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लि. (एचए कंपनी) ची आर्थिकस्थिती ढासळल्याने 1996 साली या कंपनीला केंद्र सरकारकडून 136 कोटींचे आर्थिक पॅकेज देण्यात आले. त्यांतरही केलेल्या उपाययोजना कंपनीला पूर्वपदावर आणू शकल्या नाहीत. बॅंकांकडून घेतलेले कर्ज व अन्य देणी मिटविण्यासाठी कंपनीची जागा विक्रीसाठी काढली आहे. मात्र, ही बाब प्रलंबित आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कॉस्ट कटिंगअंतर्गत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, 400 कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. तर चार वर्षांपासून रखडलेली वैद्यकीय बिले कामगारांना मिळालेली नाहीत. 1999 ते 2006 या कालावधीतील वेतनवाढ करारापोटी मिळणारी लाखो रुपयांची रक्कम अद्यापही कामगारांच्या खात्यात जमा झालेली नाही. सविस्तर लेखी मागणी करुनही प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
एच.ए. सोसायटी व एआरसी बंद करण्यासाठी नोटीस बजावली आहे. त्यामुळे यामधील रक्कम कामगारांच्या खात्यात जमा करण्याची मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली. याविरोधात 19 जानेवारीला प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान, कंपनी व्यवस्थापनाशी भेट घडवून आणण्यासाठी मध्यस्थी करण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिल्याने, हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
यामध्ये सेवानिवृत्त कामगार शंकर बारणे, संपतराव पाचुंदकर, श्रीनिवास करंजखेले, संभाजी मुळीक, शाम पत्की, मोरेश्वर थिटे, वनिता धिवार, श्रद्धा भोसले, वर्षा गिलबर्ट, लिना चावरिया, अरुण बोऱ्हाडे, सुनील शहा, नंदकुमार अडसूळ आदी कामगार सहभागी झाले होते.