नवी दिल्ली – तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यावरून समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. विरोधकांचे सदस्यत्व घालवण्यासाठी वापरले जाणारे निकष सत्ताधारी पक्षासाठी लागू केल्यास त्यांचे एक-दोनच खासदार, आमदार उरतील, असे त्यांनी म्हटले.
संसदेत महुआ यांच्या पाठिशी इंडिया या विरोधी पक्षांच्या देशव्यापी आघाडीतील सदस्य उभे राहिल्याचे दिसून आले. महुआ यांच्यावरील कारवाईचा विरोधकांनी निषेध केला. अखिलेश यांनीही सोशल मीडियावरून भाजपला लक्ष्य केले.
विरोधकांचे सदस्यत्व घालवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी एखादा सल्लागार नेमावा. त्यामुळे सत्ताधारी गोटातील मंत्री, खासदार आणि आमदारांचा वेळ कारस्थाने करण्यासाठी वाया जाणार नाही. त्यातून ते लोकहिताच्या कार्यांसाठी अधिक वेळ देऊ शकतील, अशी उपहासात्मक टिप्पणी त्यांनी केली.
सपही इंडियाचा घटक आहे. त्या आघाडीचे घटक असणारे पक्ष महुआंच्या पाठिशी उभे राहिल्याबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आभार मानले.