साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त

रिमझिम पावसामुळे वातावरणात आलेला दमट वातावरण, चोहीकडे साचलेले पाणी आणि चिखलाची दलदल यांमुळे साथीच्या रोगांचे प्रमाण वाढले असून नागरिक सध्या साथीच्या आजारांनी त्रस्त झाले आहेत. एकीकडे दुखण्याच्या वेदना आणि दुसरीकडे खिशाला होणारी आर्थिक झळ यामुळे पुरंदरकरवासीय मेटाकुटीला आले आहेत.

दरवर्षी पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण अधिक असते. या वर्षीही तालुक्‍यात थंडी, ताप, डेंग्यूसदृश आजार, सर्दी, खोकला, कावीळ, पेशी कमी होणे अशा विविध प्रकारच्या साथीच्या रोगांनी सासवड, जेजुरी, नीरा या प्रमुख शहरांनाही वेढा घातला आहे. उघड्यावर कचरा टाकण्याचे वाढते प्रकार, सांडपाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, भुयारी गटारांची दुरवस्था, ग्रामीण भागात भारत स्वच्छता अभियानाबाबत केल्या जाणाऱ्या जनजागृतीच्या अभावामुळे येभे साथीच्या रुग्णांचे प्रमाण वाढते आहे.

ग्रामीण भागातील अनेक रुग्ण शहरांमधील रुग्णालयात दाखल झाल्यावर शहरातील नागरिकांच्या संपर्कात आल्याने शहरवासीयांमध्येही या रोगांचे प्रमाण वाढले आहे. या साथीच्या रोगांच्या वाढत्या प्रमाणावर प्रशासनाने वेळीच नियंत्रण आणण्याची गरज आहे, तसेच आरोग्य विभागाकडून याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. रुग्णालयांबाहेर रुग्णांच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. प्रत्येक दोन ते तीन घरागणिक एक रुग्ण अशी अवस्था तालुक्‍याची आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचा समावेश अधिक आहे. जर दरवर्षी साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो तर प्रशासनाने यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे तितकेच गरजेचे आहे. “नेमेचि येतो पावसाळा’ याप्रमाणे नेहमीच येतात साथीचे रोग असा प्रकार सुरू आहे. मुळातच आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारची जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाय केले जात नाहीत, त्यामुळे तालुक्‍याच्या ग्रामीण भागासह शहरी भागातही साथीच्या आजारांचे लोण पसरले आहे.

सामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबियांच्या मुलांचे नुकतेच शैक्षणिक वर्षांचे प्रवेश व शैक्षणिक साहित्याच्या खर्चाचा ओझं उतरत नाही तोच आता दवाखान्याच्या खर्चाचे ओझही नागरिकांच्या मानगुटीवर वाढू लागले आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गोरगरीब व मध्यमवर्गीयांचे हाल होत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.