दागिण्यांसह सीसीटीव्ही रेकॉर्डरही नेले
पुणे – नाना पेठेतील शितळादेवी मंदिरातील देवीचे चांदीचे दागिने आणी रोकड असा सुमारे 11 हजार रुपयांचा ऐवज चोरण्यात आला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरांनी जाताना सीसीटीव्हीचे रेकॉर्डींन युनिटीही चोरुन नेले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार रविवारी सकाळी परिसरातील नागरिक व पुजाऱ्याला मंदिराचे कुलूप तोडण्यात आल्याचे दिसले. त्यांनी आत जाऊन पहाणी केली असता, देवीचे चांदीचे दागिने व दानपेटीतील रक्कम चोरीला गेल्याचे आढळले. यानंतर तेथील रहिवाशी भारत कोटा(40) यांनी तक्रार दिली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिलेल्या माहितीनूसार शितळादेवी मंदिर हे एका सोसायटीच्या पार्किगच्या परिसरात आहे.
मंदिराच्या चारही बाजूंनी इमारती आहेत. काही वर्षापुर्वी मंदिरा हे एका वाड्यात होते. वाडा पाडून तेथे सोसायटी बांधण्यात आली. चोराने मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर त्याने मुर्तीचे दागिने व दानपेटीत जमा झालेली रक्कम चोरली दान पेटीत नक्की किती रक्कम होती हे कळू शकले नाही.
चोरट्याने जाताना सीसीटीव्हीचे रेकॉर्डरही चोरुन नेले. यामुळे मंदिर नक्की किती वाजता फोडण्यात आले व किती चोरटे होते हे समजू शकले नाही. पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेऊन तपास करत आहेत.