धारदार शस्त्राने दोन महिलांसह चौघांवर वार
पुणे : सहा महिण्यापुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून एका कुटूंबावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यामध्ये दोन महिलांसह चौघे गंभीर जखमी झाले आहेत. सहकारनगर पोलिसांनी चौघांविरुध्द खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी महादेव जयसिंग आरसूळ(36), त्यांची पत्नी रंजना(32), मावशी पदमीनी कदम(55) व मावस भाऊ शंकर कदम(38) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी पप्पु पांडव, ओंकार पांडव, दत्ता पांडव (रा.शांतीनगर, धनकवडी ) व पप्पु पांडवच्या मेव्हण्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी व आरोपी शेजारी शेजारी रहातात. फिर्यादी महादेव यांच्या मुलाचे करोनामुळे ऑन लाईन शिक्षण सुरु आहे.
सहा महिण्यापुर्वी आरोपी त्यांच्या घरातील टीव्ही व म्युझिक सिस्टमचा आवाज मोठा ठेवत असल्याने त्यांच्यात वाद झाले होते. याचा राग पांडव परिवाराच्या मनात होता. दरम्यान शनिवारी दुपारी पप्पु पांडव यांनी महादेव यांना रस्त्यात अडवले. तु माझ्याकडे खुन्नसने का बघतोस म्हणून शिवीगाळ केली. यानंतर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर व हाताच्या पंजावर कोयत्याने वार केले. त्यांची पत्नी, मावाशी व मावस भावावरही लोखंडी हत्याराने वार केले. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक किरण मदने करत आहेत.