कराड – मलकापूर, ता. कराड येथील एका ट्रान्सपोर्ट कार्यालयात चोरी केल्यानंतर चोरट्याने कार्यालयच पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक मोहम्मदकाहीर अब्दुलरहिमान पटणी (रा. वाखाण रोड, कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोहम्मदकाहीर पटणी यांचे मलकापुरातील तुळजाईनगरमध्ये मेट्रो ट्रान्सपोर्ट नावाचे कार्यालय आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि. 26) सकाळी 9 वाजता कार्यालय उघडले. दिवसभर काम करून त्यांनी रात्री 8 वाजता कार्यालय बंद केले.
दुसऱ्या दिवशी (बुधवारी) सकाळी पटणी घरीच असताना त्यांना वाहनचालक रमजानने फोन करुन कार्यालयाचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. त्यामुळे पटणी तातडीने कार्यालयात गेले असता, फर्निचर, सीसीटीव्ही प्रणालीचा डीव्हीआर, संगणक संच, पंखा, हार्डडिस्क आदी साहित्य जळाले होते. काचा व फरशांची तोडफोड करण्यात आली होती. कार्यालयातील एक लॅपटॉप व कपाटातील 35 हजार रुपये चोरीस गेल्याचेही स्पष्ट झाले.