सातारा -लोकसंख्येनुसार जिल्हा परिषद गटांची पुनर्रचना करण्यात आली असून सातारा जिल्हा परिषदेचे दहा गट नव्याने वाढले आहेत. यापूर्वी 64 सदस्य संख्या असलेली जिल्हा परिषद आता 74 सदस्यांची होणार आहे. पंचायत समितीचे 20 गण वाढणार असून 128 वरुन ही संख्या 148 कडे गेली आहे. ग्रामविकास विभागाने याबाबत राजपत्र प्रकाशित केले आहे.
सातारा जिल्हा परिषदेचे यापूर्वी 64 सदस्य होते तर पंचायत समितीचे 128 सदस्य कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वी लोकसंख्येच्या प्रमाणात गट व गणांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला होता. राज्य विधानसभेतही याबाबतची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी दिली होती. त्यानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 10 गट व पंचायत समितीच 20 गण वाढतील या शक्यतेवर गुरुवारी ग्राम विकास विभागाने याबाबत राजपत्र प्रकाशित करुन शिक्कामोर्तब केले आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात वाढणाऱ्या दहा गटांबाबत उत्सुकता असून इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लांबल्या असल्या तरी इच्छुकांनी मात्र आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी सुरु केली आहे. मात्र, नवे दहा गट कोणते याची माहिती अद्याप उपलब्ध व्हायची आहे.