सव्वा दोन कोटींच्या कामांना ठेकेदाराकडून चुना

डांबरीकरणाची कामे निकृष्ट दर्जाची : सत्ताधारी नगरसेवकांचा घरचा आहेर

सातारा – सातारा शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून सव्वा दोन कोटींच्या रस्त्याच्या कामाचा ठेका शिंदे नावाच्या एजन्सीला देण्यात आला आहे. शहरातील अनेक भागात धुमधडाक्‍यात डांबरीकरणाची कामे सुरु झाली, पण ती आता अर्धवट स्थितीत राहिली आहेत. खा. उदयनराजेंनी रस्त्यांची कामे दर्जेदार करा. कामात हलगर्जीपणा चालणार नाही, अशी तंबी दिली असतानाही ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामाला चुना लावला जात आहे. डांबराचा कमी प्रमाणात वापर केल्यामुळे कूपर बंगला ते कनिष्क हॉलपर्यंतचा रस्ता अनेक ठिकाणी उखडला आहे. रस्त्याचे काम अर्धवट सोडून ठेकेदार पळून गेला आहे, असे नगरसेवक आणि नागरिकांनी बोलताना सांगितले.

सव्वा दोन कोटींचा निधी हा शासनाकडून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत पालिकेला मिळाला आहे. हा निधी शहरातील रस्त्यांवर टाकला गेला आहे. पण या निधीतून रस्त्यांची कामे दर्जेदार होतात की, नाही याची पाहणी मुख्याधिकारी गोरे यांनी करायला हवी होती. नगरसेवकांनी तक्रारी केल्या तरी दखल घेतली गेली नाही. हा निधी शासनाकडून आला आहे. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी या प्रकरणी लक्ष घालून रस्त्यांच्या कामांची पाहणी करावी. ठेकेदाराची बीले कढण्यात येऊ नयेत. अन्यथा नागरिकांसह पालिकेसमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा सत्ताधारी नगरसेवकांनी व सातारकरांनी बोलताना दिला आहे.

दरम्यान सातारा पालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्याकडे डांबरीकरणाची कामे निकृष्ट दर्जाची होत आहे, अशा तक्रारी केल्या तरी दखल घेतली जात नाही. उलट त्या ठेकेदारालाच पाठिशी घालत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनीच या निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करावी. अन्यथा नागरिकांसह पालिकेच्या दारात आंदोलन करावे लागेल, असा इशारा सत्ताधारी सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांसह नागरिकांनी बोलताना दिला आहे.

सातारा नगर पालिकेला 2017-2018 या वर्षी दलित वस्ती सुधार योजनेतून सव्वा दोन कोटींचा निधी मिळाला आहे. या मिळालेल्या निधीतून पालिकेने शहरातील विविध भागातील रस्त्यांची डांबरीकरणाची कामे हाती घेतली आहेत. राजतारा हॉटेल ते भोसले मळा परिसर, सातारा बसस्थानक ते पारंगे हॉस्पिटल कूपर बंगला ते कनिष्क हॉल, तर मिलिटरी कॅन्टीन परिसरातील 70 लाखाचे काम शिंदे एजन्सीला दिले आहे. अशी शहराच्या विविध भागातील रस्त्यांची कामे शिंदे एजन्सीला देण्यात आली आहेत.

या रस्त्याच्या कामांचा शुभारंभ धुमधडाक्‍यात खा. उदयनराजे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी खासदारांनी सांगितले होते की, मला कामात हलगर्जीपणा चालणार नाही आणि मी खपवून घेणार नाही. असे त्या ठेकेदाराला ठणकावून सांगितले होते. तरीही त्या ठेकेदाराने उदयनराजेंच्या सूचनांचे पालन केल्याचे दिसून येत नाही. रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे करून ठेकेदाराने पालिकेला चुना लावला आहे. असा घरचा आहेर देत नाव न छापन्याच्या अटीवर सांगितले की, या ठेकेदाराने आतापर्यंत जेवढी कामे केली आहेत त्या कामांची कॉलिटी कंट्रोलकडून तपासणी करून घ्यावी. म्हणजे ठेकेदाराच्या कामातील दर्जेदारपणा ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या मुख्याधिकारी गोरे यांना कळेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.