उकाडा कायम : राज्याच्या काही भागांत पावसाची हजेरी
पुणे – पुणे शहरातील तापमानाचा पारा अद्यापही चाळीस अंशाच्या जवळपास असल्याने उकाडा कायम आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागांत पावसाने हजेरी लावल्याने संध्याकाळच्या सुमारास हवेत गारवा निर्माण झाला आहे.
शहरात यंदा विक्रमी तापमानाची नोंद होत आहे. साधारण 15 एप्रिलनंतर शहरात तापमानाचा पारा हा चाळीशीच्या पुढे जातो; पण यंदा मार्च महिन्यातच तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. त्याचबरोबर तापमानाचा आकडा कायम आहे. त्यामुळे उन्हाळ तीव्र जाणवत आहे.
शहरात दुपारच्या काळात उन्हाचे चटके तीव्र असतात. त्यामुळे अनेकजण याकाळात घराबाहेर पडणे सुद्धा टाळत आहेत. दरम्यान, गुरुवारी संध्याकाळी शहरात थोड्या फार प्रमाणात गारवा निर्माण झाला होते. त्याचबरोबर गारवारेही वाहात होते. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शहरात आगामी दोन दिवस तापमानाचा पारा हा चाळीशीच्या आसपास राहणार आहे.
राज्यात सुद्धा अनेक भागांत तापमान चाळीस अंशाच्या पुढे गेले आहे. गुरुवारी सर्वांधिक तापमान अमरावतीमध्ये 43 अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले. शिवाय, कोकण वगळता राज्यातील अनेक भागांत तापमानाचा पारा हा चढाच आहे.
मराठवाड्यात वादळी पाऊस
गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या चटक्यांनी होरपळणाऱ्या मराठवाड्यातील काही भागांत गुरुवारी वादळी पावसाने हजेरी लावली. बीड तसेच उस्मानाबादमध्ये संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारी विदर्भात काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.