मंचर, (प्रतिनिधी) – जवळे (ता. आंबेगाव) येथील नदीपात्रातील चार वर्षांपूर्वी सुरू केलेल्या बुडीत बंधाऱ्याचे काम अर्धवट झाले असून सदर काम रेंगाळले आहे. बुडीत बंधाऱ्याचे काम तात्काळ पूर्ण व्हावे,अशी मागणी जवळे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
जवळे येथे निरगुडसर-जवळे गावाला जोडणारे पुलाच्या पश्चिमेला घोड नदी पात्रात चार वर्षापूर्वी बुडीत बंधाऱ्याचे काम सुरू झाले होते. त्या वेळच्या संबंधित ठेकेदाराने काहीं कारणास्तव काम अर्ध्यावरच सोडून दिले आहे.
चार वर्षे होऊनही बंधाऱ्याचे काम सुरू झाले नाही. बंधाऱ्याचे काम झाल्यानंतर नदीपात्रात पाणी कमी झाल्यास त्या ठिकाणी पाणी साचून त्याचा फायदा शेती पिकांना व शेतकऱ्यांना होणार आहे.
त्यामुळे या बाबत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लक्ष घालून संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सदर बंधाऱ्याचे काम तात्काळ पूर्ण व्हावे, यासाठी सूचना द्याव्यात,अशी मागणी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर, व जवळे ग्रामस्थांनी केली आहे.