मंचर (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात गेले आठ दिवसांपासून विविध गृह सोसायटींतील सार्वजनिक पार्किंगमधून मोटार सायकल चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. तर पाळत राखत अनेकांच्या दुचाकी गाड्यामधील पेट्रोल काढून चोरीला जात आहे, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी डोबी मळा येथील अमरनाथ मार्केट येथील रवींद्र निवृत्ती गावडे यांची स्पेंडर गाडी क्रमांक एम एच 14 S 4587 टू व्हीलर गाडी रविवार, दि. २१ रोजी सायंकाळी ६ वाजून ४५ वाजता सोसायटी पार्किंगमधून चोरीला गेली. विशेष म्हणजे त्याचं वेळी सोसायटी पार्किंगमध्ये एका कुटुंबातील वाढदिवस कार्यक्रम सुरू होता. इतक्या गजबजलेली सोसायटी असताना गाडी चोरीला गेली आहे.
अशा अनेक सोसायटीमध्ये दिवसभर निरीक्षण करणारे व्यक्ती आजूबाजूला फिरत असतात. मंचर शहरात शेकडो गृह निर्माण सोसायटी आहेत. त्यांच्याकडे सुरक्षा रक्षक नेमलेले असतात. पण काही सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक नेमले नाहीत. तेथील चारचाकी, दोन चाकी वाहने चोरीस जात आहेत. याबाबत पोलीस फिर्याद लवकर घेत नाही. चोरी करणारे चोर चोरीच्या गाड्या नेमके कुठे ठेवतात ते पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न करावा.
आजपर्यंत असंख्य मोटारसायकलमधील पेट्रोल चोरीला जाते. अनेक सोसायटीमध्ये सी सी टिव्ही कॅमेरे बसविले. मात्र, त्यांची क्षमता पॉवर कमी असल्याने ते रात्री पूसट दिसतात. याबाबत मंचर पोलिसांनी चोरलेल्या मोटार सायकल शोध मोहीम राबवून संशयास्पद व्यक्ती शोधाव्यात, अशी मागणी रवींद्र निवृत्ती गावडे यांनी केली आहे.