पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महावितरणमध्ये अभियंता असल्याची बतावणी करून थकीत बिलप्रकरणी वीजपुरवठा खंडित करण्याचे सांगून ९४ हजार २३५ रुपये लंपास करण्यात आले. याप्रकरणी एका सायबर भामट्याविरोधात लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघोली परिसरातील बकोरी रोड येथे राहणार्या ३१ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार ६ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडला. आरोपीने फिर्यादी यांच्या वडिलांच्या मोबाइलवर संपर्क केला. त्यानंतर मी महावितरणमधील अभियंता असून, तुमच्या वीजबिलाचा भरणा करण्यात आला नाही,
तसेच संबंधित थकबाकी लवकरात लवकर भरा; अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असे सांगून त्यांच्या मोबाइलवर लिंक पाठविली. याद्वारे त्याने बँक खात्यातील ९४ हजार २३५ रुपये काढून घेत आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक कैलास करे करीत आहेत.