पिंपरी – चऱ्होली येथे उभारण्यात येत असलेल्या संतसृष्टीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. 25 शिल्पांपैकी 22 शिल्प बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये उर्वरित काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
चऱ्होली येथील थोरल्या पादुका मंदिराच्या ईशान्य दिशेला असलेल्या उतारावरील मैदानात संतसृष्टी विकसित होत आहे. ही संतसृष्टी 3.5 एकर जागेवर विकसित करण्यात येत आहे. त्यामध्ये सध्याचे मंदिर 0.51 एकर क्षेत्रामध्ये आहे. संतसृष्टी 2.3 एकरावर विकसित होत आहे. 0.65 एकर क्षेत्र पार्किंगसाठी राखीव ठेवले आहे.
संतसृष्टीचे क्षेत्र 30 मीटर रुंद रस्त्याने वेढलेली आहे. संत सृष्टी साइट फॉर्म विठ्ठलाच्या कपाळी असलेल्या टिळ्याच्या आकाराप्रमाणे आहे. या जागेत मध्यभागी ओपन एअर थिएटर उभारण्यात येत आहे. संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज भावंडांसह भेट झाली, या संकल्पनेवर आधारित मुख्य कांस्य समूह शिल्प उभारण्यात येत आहे. त्या
मध्ये 25 शिल्प एकत्रितरित्या दाखविण्यात येत आहे. संतसृष्टीमध्ये संत नामदेव महाराज यांचे सर्वांत उंचीचे 23 फूट शिल्प आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांचे 18.5 फूट उंच शिल्प आहे. संत निवृत्ती महाराज यांचे 20 फूट तर, संत सोपानदेव महाराज यांचे 17 फूट उंचीचे शिल्प आहे. संत मुक्ताबाई यांच्या शिल्पाची उंची 15 फूट इतकी आहे.
उर्वरित 20 कांस्य शिल्पांमध्ये वारकरी पुरूष (10.5 फूट उंच), महिला (9.5 फूट उंच) आणि एक मुलगी (6 फूट इंच) आदी प्रमुख शिल्पांचा समावेश आहे.
चऱ्होली येथील संतसृष्टीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. 25 शिल्पांपैकी 22 शिल्प बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये उर्वरित काम पूर्ण केले जाणार आहे.
– संजय घुबे, कार्यकारी अभियंता