काम हिच देशसेवा

मित्रा, मला नेहमी वाटतं त्या वेळी जन्माला यायला हव होतं. सुनीलने शिवाजीला विचारले, म्हणजे केव्हा. तो म्हणाला, मला प्रत्येक 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे ला त्या सर्व हुतात्म्यांची आठवण येते आणि खूप अभिमान वाटतो. कधी कधी तर असे वाटते, छत्रपती शिवरायांच्या काळात जन्माला आलो असतो तर, किमान मावळा म्हणून लढलो असतो.

शिवाजी सुनीलला सांगत होता, या लोकांनी आपल्या मातृभूमीसाठी आपले बलिदान दिले आहे. छत्रपती शिवराय यांचे स्वराज्य ते स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत अनेकांनी देशासाठी योगदान दिले आहे. म्हणूनच आपण आज या देशात आनंदाने जगत आहोत. विविधतेत एकता असलेला आपला देश आहे. सुनील म्हणाला, अरे कधी, केव्हा आणि कुठे जन्माला यायचे हे काय आपल्या हातात असते का? आजही अनेक जवान देशाच्या सीमेवर रक्षण करता करता शहीद होतात. मला पण सैन्यात भरती व्हावे असे वाटते. परंतु त्याच्यासाठी आवश्‍यक ज्ञान आहे. पण शिक्षण नाही आणि शारीरिक क्षमताही हवी आहे. पण माझी शारीरिक क्षमता आवश्‍यक तेवढी नाही.

सुनील, शिवाजीचे जोशपूर्ण मनोगत ऐकत होता. त्याला देशासाठी काहीतरी करायची खूप इच्छा होती. सर्व सामान्यांसारखे जगणे त्याला नको वाटत होते. त्याचवेळी सुनीलने त्याला देशासेवा करणाऱ्या समाजसेवकांची पद्म पुरस्कार मिळालेल्या अनेक जणांनी समाज, देशासाठी काम करण्याची आठवण करून देत माहिती दिली. सुनील म्हणाला, अरे देशातील प्रत्येकाने जरी ठरवले ना, की आपण देशाची सेवा करायची तरी देश सुजलाम्‌ सुफलाम्‌ होईल.
दोघेच जेवण करून कॉलेज हॉस्टेलच्या बाहेर निवांत कट्ट्यावर बसले होते. सुनील त्या दिवशीची, त्या रात्रीची, एक गोष्ट शिवाजीला सांगू लागला.

त्या रात्री, नेहमीप्रमाणे एक बस प्रवासी कंपनीच्या वेळेनुसार थांब्यावर थांबली होती. रात्रीचे साडे आठ-नऊ वाजले असतील. बस दिसायला अतिशय सुंदर दिसत होती. प्रत्येक थांब्यावरचा कंपनीच्या, ऑफिसच्या बाहेरचा प्रवासी, घेवून बस पुढे जात होती. गाडीचा ड्रायव्हर शहरातील त्यांच्या ठरवलेल्या थांब्यावर प्रवासी कंपनीच्या प्रतिनिधी, ज्यांनी, ज्यांनी या गाडीचे तिकीट घेतले आहे, त्याचे तिकीट तपासत त्यांना बसमध्ये बसायला सांगत होता. ड्रायव्हर आदराने सर्वांचे स्वागत करत होता. प्रत्येकाला पाणी बाटली, एक चॉकटले देवून तो आदरातिथ्य करत होता. सर्व प्रवाशी घेऊन शहराबाहेर बस निघाली. जवळजवळ दहा वाजले होते. गाडीतल्या, लाइटची प्रखरता कमी केली व हळू आवाजात जुनी गाणी गाडीत वाजत होती. कुणी मोबाइलवर व्हॉट्‌सऍप पाहत होता. तर काही जण नातेवाईकांना निघालो असा निराप देत होते. उद्या सकाळी किती वाजता पोहचेल याची व्यवस्था करत होते.

गाडी निघाली साधारणतः अकरा वाजले असतील, बसमधील लाइट्‌स पूर्ण बंद केले. गाडी उशिराने निघाल्याने पुन्हा जेवणासाठी थांबणार नाही असे ड्रायव्हरने सर्वांना सांगितले होते. पूर्ण रात्रभराचा प्रवास होता. रस्त्याची अवस्था तशी फारशी चांगली नव्हती. परतु प्रवाशांना त्रास होणार नाही या बेताने गाडी चालू होती.

घड्याळात रात्रीचे पावणे बारा वाजले असतील. तर गाडी रस्त्यांच्या कडेला थांबली. काहींना झोप लागली होती. काहींना लागायच्या बेतात होती. काही अर्धवट झोपले होते. आता गाडी अचानक का थांबली असेल म्हणून प्रवाशांच्या मनात प्रश्‍न निर्माण झाले. कोणाला वाटले गाडी चोरांनी अडवली असेल तर? त्यांनी आपल्या जवळ असलेले दागिने, पैसे वेगवेगळ्या ठिकाणी लपवायला सुरुवात केली. काहींना वाटले काहीतरी बिघाड झाला असेल तर? आपल्याला उद्या उशीर होणार, दिवसभरांची कामे होणार नाहीत. असे एक ना अनेक प्रश्‍न प्रत्येक प्रवाशांच्या मनात आले. गाडीच्या ड्रायव्हरने त्याच्या कॅबीनमधून बाहेर येत सांगितले की गाडी वेळेवर सकाळी पोहचणार आहे. “”कोई प्रॉब्लेम नही है। अभी मैने गाडी यही रुकवा दी है, क्‍योंकी मैं ये बताना चाहता हूँ की आज रात बारा बजे हमारे देश को स्वतंत्रता मिले हुए पचास साल पुरे होने वाले है। इसलिए आप सबसे बिनती है की आप लोग निचे आ जाये।” गाडीचा ड्रायव्हर सरदारजी होता.

ड्रायव्हरने सांगितल्यामुळे सर्वांच्या जीवात जीव आला व त्यांना आश्‍चर्यही वाटले. त्यांनी सर्वांना खाली बोलावले. रांगेत उभे राहण्याच्या सूचनाही दिल्या. गाडीच्या केबिनमधील तिरंगा ध्वज सन्मानाने बाहेर आणला. गाडीच्या टपावरील ध्वजस्तंभ काढला. त्या ध्वजस्तंभाला गाडीच्या पुढील बाजूस बांधले आणि बरोबर बारा वाजता गाडीतील एका ज्येष्ठ प्रवाशाच्या हस्ते ध्वजारोहण केले. सर्वांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. थोड्याच वेळात सर्वांना त्याने आणलेली मिठाई वाटली.

ध्वजारोहणाचा सोहळा आटोपला आणि सर्वजण पुन्हा गाडीत आले तेव्हा गाडी सुरू होण्याअगोदर गाडीतील एका प्रवाशाने उभे राहून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. गाडीतील पत्रकार प्रवासी यांनी आठवण करून दिल्याबद्दल ड्रायव्हरचे आभार मानले. पत्रकार महाशय आणि गाडीतील प्रत्येकजण भावूक झाला होता. त्यावर ते पत्रकार ड्रायव्हरला उद्देशून म्हणाले “”ड्रायव्हर साहब हम सब लोक तो भूल गये थे की आज ये सुवर्ण दिन हमारे लिये गौरवशाली है। हम सबको स्वतंत्रता मिले हुए पचास साल पुरे हुये है। त्यावर त्या सरदारजी ड्रायव्हरने उत्तर दिले, “”कुछ नहीं जी, मैं ये बताना चाहता हूँ की, मैं मेरे किस्मतसे ड्रायव्हर हूँ, लेकिन मेरा सौभाग्य है की मैं भगतसिंह के घराने का हूँ। सुनील ही गोष्ट सांगता सांगता कट्ट्यावर अनेक मित्रही जमा झाले. सर्वजण तल्लीन होऊन ते ऐकत होते. यालाच म्हणतात, आपले काम हीच आपली देशसेवा!

अनिल गुंजाळ

Leave A Reply

Your email address will not be published.