DP मधलं प्रेम

किती वर्षे झाले होते त्यांच्या लग्नाला? रूसत, फुगत, चिडत, रागवत, समजूत काढत, समजून घेत त्यांनी त्यांचा संसार नावारूपाला आणला होता. नव्याची नवलाई कधीच संपली होती. संसाराचे चटके बसून संसार चांगलाच रापला होता. वार्ध्यक्‍याची चाहूल मात्र त्यांच्या वागण्याबोलण्यात मुळीच जाणवत नव्हती. दुःख झाकून ठेवायची सवय होती दोघांना.

ती म्हणजे एक रोप असतं. माहेरच्या मातीतून मुळासकट उपटून आणलेलं. सासरच्या मातीत रोवलेलं. सासरच्या मातीचे कोणतेच गुणधर्म माहीत नसतात त्या रोपट्याला. आशा असते ती एवढीच की सासरचे सगळे प्रेमाचं खतपाणी घालतील तिच्या मुळाशी. नवरा आधार होईल. संकट येईल तेव्हा मान खांद्यावर घेईल. कुणी काढलाच ओरखडा मनावर आणि लागलंच मन भगभगू तर नवरा फुंकर होईल. त्यानेही काळजी घेतली त्याच्यापरीने. अगदीच फुलासारखं जपलं तिला असा दावा नव्हता त्याचा. तिला नाही पण तिच्या मनाला जपायचा प्रयत्न करायचा तो. तरीही आदळआपट करावी असे प्रसंग यायचेच. पण ती सावरून घ्यायची, आदळआपट टाळायची. नुसता चेहऱ्यावर रुसवा आणून बसायची आणि मग तो तिची कळी खुलवण्यासाठी धडपडायचा.

अशीच वर्षामागून वर्षे गेली होती. नुकताच त्यांनी त्यांच्या लग्नाचा रौप्यमहोत्सव साजरा केला होता. रौप्य महोत्सव झाला त्यालाही दोन वर्षे होत आली होती. आणखी एक वर्धापनदिन अवघ्या एक दोन दिवसावर आला होता. तिने त्याच्या व्हॉट्‌सऍपला दोघांचा एक फोटो पाठवला. मग लाडात येत म्हणाली, उद्या आपला फोटो ठेवा ना डीपीला. तो म्हणाला, नाही. मी नाही ठेवणार. कसे ठेवाल? तुमचं प्रेमचं नाही ना माझ्यावर. तिचा चेहरा पडलेला. अच्छा! म्हणजे सत्तावीस वर्षांनंतर तुला मी ठेवलेल्या डीपीत प्रेम शोधण्याची गरज भासते आहे तर? त्याचा तेवढाच बिनतोड प्रश्‍न. ती निरुत्तर. पण अबोल.

ज्या दिवशी त्यांच्या विवाहाचा वर्धापनदिन होता, त्या दिवशी जाग येताच त्याने तिला मिठीत घेतलं. खरंतर आजवरच्या सत्तावीस वर्षांत त्याने तिला हजारो वेळा मिठीत घेतलं असेल. तरीही नेहमीप्रमाणेच त्याच्याआजच्या मिठीत सुद्धा नावीन्य होतं. चैतन्य होतं. ओढ होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्तावीस वर्षे अनेक उन्हाळे पावसाळे सोसत, अडीअडचणींना तोंड देत, तिने त्याला ज्या रीतीने साथ दिली, त्याच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढला त्याविषयीची कृतज्ञता होती. त्या मिठीत आपुलकीचं चांदणं होतं. त्या स्पर्शात प्रेमाची फुलं होती. ती सारी फुलं त्याने तिच्यावर उधळली आणि तिची जिवणी उचलून म्हणाला, विवाहदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजवर दिलीस अशीच साथ शेवटच्या श्‍वासापर्यंत देशील असा विश्‍वास आहे मला.

खरंतर नेहमीप्रमाणेच आजही तिच्या अंगभर रोमांच उभे राहिले होते. मनभर हव्याहव्याशा गुदगुल्या होत होत्या. तिच्या मनातही प्रेमाचा परिमळ दरवळत होता. पण ती त्याच्या मिठीत तशीच उभी राहिली. अबोल. फुरंगटलेली. कळी अजूनही खुलत नाही हे त्याच्या लक्षात आलं. खरंतर लग्नाच्या वर्धापनदिनाचं, तिच्या वाढदिवसाचं, सणावाराचं औचित्य साधून तो तिला नियमित असं काही घेत नव्हता. त्याने घेतलं नाही आणि तिने मागितलं नाही. काय घ्यायचं? संसारोपयोगी काही घ्यावं तर ते संसारासाठी झालं. तिच्यासाठी काय घेणार? साडी किंवा फारफार तर ड्रेस. पण येन ना केन कारणाने तिला वर्षाकाठी इतक्‍या साड्या यायच्या की त्याच वापरणं तिला व्हायचं नाही.

भाऊबीजेला, राखीपोर्णिमेला भावाची साडी यायची. माहेरपणाला गेली की माहेरची साडी यायची. लग्नकार्यात सुद्धा छान छान आणि किमती साड्या यायच्या आहेरात. त्याने सत्तावीस वर्षांत तिला अवघ्या चार सहा साड्या घेतल्या असतील. पण तिच्या कपाटात साड्यांची कायम रेलचेल असायची. मग आणखी आपण कशाला साडी घेऊन तिच्या कप्प्यात अडचण करायची. म्हणून तो टाळायचा साडी घ्यायची. देण्याघेण्यात प्रेम नसतंच, व्यवहार असतो. अशी वैचारिक बैठक होती त्याची. सिनेमाचाही शौक नव्हता त्याला आणि हॉटेलाची सुद्धा हौस नव्हती. दोघांनी मिळून औटींगला जायला आवडलं असतं त्याला. पण संसार सावरताना फिरायला जायला जमलंच नाही कधी. पाचगणी महाबळेश्‍वर सुद्धा एखाद्या दुसऱ्या वेळेला झालं असेल. कुलू मनाली, लडाख, जयपूर ही ठिकाणं तर नकाशावर सुद्धा शोधायचे नाहीत दोघे. असाच संसार झाला सत्तावीस वर्षे. तिने न मागता आणि त्याने न देता. मग वाटलं त्याला, आज काहीतरी घेऊन द्यायचं प्रॉमिस करू तिला. मग खुलेल कळी. असं मनात येऊन त्याने तिला विचारलंही, तुला काय भेट देऊ आज?

तिचं मात्र तेच पालुपद. मी कालच सांगितलं आहे तुम्हाला, मला काय हवंय ते. अच्छा म्हणजे. डीपी ठेवायला हवा आहे तर. कशासाठी? जगाला कळायला हवं आहे का, आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे ते? तो मिठी सैल करत म्हणाला. हो कळायला हवं जगाला. बाकीचे बघा, कसे आपल्याला बायकोचा डीपी ठेवतात. फेसबुकला जोडीचा फोटो टाकतात. लाइक कॉमेंटचा वर्षाव होतो अशा पोस्टवर.

जग काय करतं याच्याशी मला काहीही कर्तव्य नाही. जगाच्या लाइक कॉमेंटचं लोणचं घालायचं नाही मला. देवाचे आणि थोरामोठ्यांचे आशीर्वाद पुरेसे आहेत आपल्या संसाराला. अशा आशीर्वादामुळेच संसार फुलला आहे आपला. सोशल मीडियावर मी आजवर अशा पोस्ट कधी केल्या नाहीत… करणार नाही. कारण प्रेम ही जगासमोर प्रदर्शन करावी अशी गोष्ट नाहीच मुळी. त्याने निर्वाणीचं उत्तर दिलं. तिलाही पटत होतं त्याचं. कळत होतं सगळं. पण वळत नव्हतं. तिचा चेहरा अजूनही तसाच होता. मलूल झालेल्या चंद्रासारखा. मग माघार घेत तो म्हणाला, आपला जोडीचा डीपीच ठेवायचा आहे ना व्हॉट्‌सऍपला. ठीक आहे. ठेवतो. मग तर खूश. तिच्या चेहऱ्यावरचं मळभ दूर झालं. मग पुन्हा तिला मिठीत घेत म्हणाला, डीपी ठेवतो मी व्हॉट्‌सऍपला. पण माझ्या मनात तुझा डीपी असतो एवढं पुरेसं नाही का तुला?
ती निरुत्तर होत त्याच्या कुशीत शिरली. त्याच्या हृदयातली तिची प्रतिमा न्याहळत राहिली.

विजय शेंडगे

Leave A Reply

Your email address will not be published.