तो सध्या काय करतो

काही दिवसांपूर्वी “ती सध्या काय करते?’ अशा शीर्षकाचे विनोदी- ललित लेख वगैरेचा नुसता धुरळा उडाला होता. आपल्या असलेल्या, नसलेल्या, भेटलेल्या, न भेटलेल्या बालमैत्रिणीवर किती लिहू आणि किती नाही असं लोकांना झालं होतं. ज्यांना खरोखरच लहानपणी प्रेमळ मैत्रिणी होत्या आणि काळाच्या ओघात संपर्क तुटले होते ते नरपुंगव फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपवर शोध घेत होते. पण मुली लग्नानंतर आडनाव बदलतात. त्यामुळे सहजी सापडत नव्हत्या. सहज मनात विचार आला, महिलांना अशी उत्सुकता वाटत नसेल का? की आपला बालमित्र किंवा “तो’ सध्या काय करतोय?

फार कोणाला अशी उत्सुकता वाटत असेल असं वाटत नाही. वाटत असती तर त्यांनी एव्हाना शोध घेतला नसता का त्याचा? त्याचं आडनाव लपत नाही. चेहरा विशेष बदलत नाही. फारफार तर डोक्‍यावरचा केशसंभार पांढरा होतो किंवा कायमचा गायब होतो. पण छे. त्यांना कित्ती कित्ती कामं असतात. आज कोणाला पैठणी मिळणार, कोणती ललना छोट्या पडद्यावर उकडलेल्या बटाट्यांची भाजी करून दाखवणार आणि सूत्रसंचालक तिचा (म्हणजे भाजीचा) एक घास मटामटा गिळून लगेच “वॉव… अप्रतिम…’ असे उद्‌गार काढणार, राणाच्या संसाराचं काय झालं, सुमी काय करतेय, अभिजित राजेच्या लग्नात आणि मधुचंद्रात बिब्बा घालणारा बबड्या आज काय नवीन उद्योग करणार, हवा येऊ देता देता आज कोणता पुरुष साडी नेसून पडद्यावर येणार, हे सगळं बघायचं असतं. या कामात त्यांचे रिटायर झालेले पतिराज देखील त्यांना कंपनी देत असतात.

करून करून तो काय करत असणार म्हणा. तो काही करण्यातला असता तर त्याने त्याच वेळी तिला यशस्वीरित्या पटवलं नसतं का? नोकरी लागल्यालागल्या तिला मागणी घालून तिच्याशी लग्न केलं नसतं का? तेव्हा लेकाचा तिच्यावर कविता लिहित बसला! आता तो जुन्या आठवणी काढून कण्हत असतो किंवा मी तरुणपणी यंव केलं, मी त्यंव केलं, इतक्‍या जणींबरोबर मौज केली, तितक्‍या जणींना नकार दिला,’ अशा थापा मारीत असतो! तो देखील तिच्याबरोबर साठीला आलाय. सेवानिवृत्त झालाय. दिवसभर मोकळा असतो. मुलांनी घेऊन दिलेल्या स्मार्ट फोनवर बायकोबरोबर टाईमपास करीत असतो.

व्हॉट्‌सऍपवर त्याला रोज भंपक सुविचार, सणासुदीच्या पोकळ शुभेच्छा, विविध संदेश, आरोग्यविषयक पोरकट सल्ले, राजकीय नेत्यांची बदनामी करणारे अपप्रचाराचे लेख येतात. तो ते वाचतो आणि कोणताही विचार न करता निर्बुद्धपणे ओळखीच्या लोकांना फॉरवर्ड करतो. जगातल्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे, सर्व रोगांवरची औषधे आपल्याला ठाऊक आहेत असा आत्मविश्‍वास त्याला व्हॉट्‌सऍपने दिलेला आहे.

फॉरवर्ड करण्याची सवय इतकी वाईट… एकदा त्याला कोणा नातलगाचे निधन झाल्याचा आणि दशक्रिया अमुक ठिकाणी असल्याचा निरोप व्हॉट्‌सऍपवर आला. कोणताही विचार न करता तो त्याने सर्व ग्रुप्सवर पाठवला. एकदा त्याचा वाढदिवस होता. लोकांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या. त्या त्याने त्याच दिवशी इतरांना फॉरवर्ड केल्या.
तो आपल्या बायकोच्या नकळत फेसबुक, व्हॉट्‌सऍपवरच्या विविध ग्रुपात बालमैत्रिणी शोधत असतो. लग्नानंतर मुली आडनावे बदलतात, जाड होतात, त्यांचे चेहरे बदलतात, त्यामुळे चटकन सापडत नाहीत, सापडल्या तरी ओळखू येत नाहीत म्हणून तो खंत व्यक्‍त करतो. कॉलेजमध्ये असताना त्याला नकार देणारी सुंदरी आज रुट कॅनाल करताना भेटली, आता जाम म्हातारी दिसतेय अशा काल्पनिक आणि कुजकट पोस्ट्‌स लिहितो. कॉलेजमध्ये असताना जिच्याकडे फार लक्ष गेलं नव्हतं अशी कोणी आज योगायोगाने भेटली आणि फार छान दिसत असली की तो मनातल्या मनात सॉलीड व्याकूळ होतो. रिटायर झाल्यामुळे त्याला आता बॉसची भीती वाटत नाही. तो सोशल मीडियावर वेळोवेळी बॉसला शिव्या घालतो. भडास काढत राहतो.

मुलं परदेशात असतील तर त्यांच्याबद्दल सतत पोस्ट्‌स लिहितो. त्यांनी पाठवलेले टी शर्ट आणि बर्म्युडा घालून बागेत फिरायला जातो. हे कपडे घालून फोटो काढतो. पण फोटोत त्याचा फक्त टी शर्ट दिसतो. कारण सुटलेले पोट लपवण्यासाठी तो फक्‍त वरचा भाग अपलोड करतो किंवा ग्रुप फोटोत मागच्या रांगेत उभा राहून ढेरी लपवतो. आपण तरुण असल्याचा देखावा करण्यासाठी डीपीवर जुने फोटो अपलोड करीत असतो. एवंच, तो सध्या काहीच करीत नाहीये, पण खूप काही करतोय असं समजतोय.

विजय तरवडे

Leave A Reply

Your email address will not be published.