शिक्रापूर -करोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांनी निस्वार्थीपणे केलेले वेगवेगळ्या स्वरूपाचे समाजोपयोगी कार्य कौतुकास्पद आहे. करोनाकाळामध्ये केलेले कार्य म्हणजे देशसेवा असल्याचे मत माहेर संस्थेच्या संस्थापिका तसेच जगातील शंभर प्रेरणादायी व्यक्तींमध्ये समावेश असेलल्या समाजसेविका लुसी कुरियन यांनी व्यक्त केले.
वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे माहेर संस्थेच्या वतीने करोना काळामध्ये समाजोपयोगी कार्य करणाऱ्या, करोनासाठी लढा देणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींचा करोना योद्धा सन्मान आयोजित करण्यात आला होता.
यावेळी माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन, अध्यक्षा हिराबेगम मुल्ला, व्यवस्थापक रमेश दुतोंडे, तुभा फाउंडेशनच्या परी हुमदुले, डॉ. स्तुती कुमार, सामिया हुमदुले, गौस सय्यद, अतुल शेळके, विक्रम भुजबळ, प्रसेंजित गायकवाड, संदीप म्हेत्रे, मंगेश पोळ, आनंद सागर, विनायक गाडे, हरिष अवचर यांसह आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सध्याच्या भयानक परिस्थितीमध्ये अनेकांनी सामाजिक भावनेतून गरजूंना मोलाची मदत केली आहे, त्यामुळे अनेक भुकेलेल्यांना अन्न मिळाले आहे व त्यामुळे गरजूंच्या कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला असल्याचे सांगत सध्याच्या परिस्थितीमध्ये नागरिकांनी पुढे येथे गरजेचे असल्याचे देखील लुसी कुरियन यांनी सांगितले.