कराड -हिंगनोळे, ता. कराड येथे भांडूप (मुंबई)हून आलेल्या 75 वर्षीय वृद्ध महिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली. हिंगनोळेत चिंतेचे वातावरण असून पोलीस प्रशासनाने सदर वृद्ध महिला रहात असलेला परीसर तातडीने सील केला आहे. दरम्यान, परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांबाबत अधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहन इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता माने यांनी केले आहे.
भांडूप मुंबई येथून खासगी ट्रॅव्हल्सने सदर वृद्ध महिला आपला मुलगा, सून व नातू यांच्यासमवेत दि. 12 जून रोजी हिंगनोळे येथे आली आहे. त्यानंतर मुलगा, सून, त्यांची मुले व इतर नातेवाईक अंतवडी येथे गेले. वृद्ध महिला गावात येताच त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. मात्र, त्यांना ताप आल्याने इंदोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेल्या असता त्यांना तातडीने कृष्णा रुग्णालय कराड येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले.
बुधवार दि.17 मे रोजी रात्री करोना पॉझिटिव्ह रिपोर्ट येताच हिंगनोळे गावात एकच खळबळ उडाली. उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड व इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजाता माने यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. यामध्ये निकट सहवासीत नऊ जणांना कराड येथे इन्स्टिट्यूट क्वारंटाइन करण्याबरोबरच घराशेजारील व नातेवाईक अशा पाच जणांना होम क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती डॉ. सुजाता माने यांनी दिली.