‘धोम’चा पाणीसाठा २४ टक्क्यांवर

धनंजय घोडके

घटत्या पाणीसाठ्याने दुष्काळाच्या झळा तीव्र
वाढत्या तापमानामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही गंभीर
गाळ न काढल्यामुळे होईना धरणात पुरेसा पाणीसाठा

पिकांवर विपरीत परिणाम
साधारणतः उन्हाळ्यात शेतकरी विविध प्रकारच्या भाज्या, भुईमुग, जनावरांसाठी घास हे उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे पिक असते. धोम धरणाच्या पात्रात पाणी कमी झाल्यास अनेक शेतकरी त्या जमिनीत मका, अथवा पावट्याचे पिक घेताना दिसतात. परंतु यावर्षी तापमानात प्रचंड वाढ झाल्याने धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पंधरा दिवसांनी सुटणारे आवर्तन या वेळेस सोडण्यात येणार नसल्याने वाई भागातील बागायती पिकांना याचा फटका बसून उत्पन्नावर त्याचा परिणाम होणार आहे.

वाई – राज्यभरात उन्हाळ्याची दाहकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सातारा जिल्ह्यातही वाढत्या तापमानामुळे अनेकठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा घटत असून वाई तालुक्‍यात असणाऱ्या परंतु वाई तालुक्‍याबरोबरच खंडाळा, फलटण, कोरेगाव आणि साताऱ्यातील जनतेची तहान भागविणाऱ्या धोम धरणातील पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात घटला. सध्या धरणातील पाणीसाठा अवघ्या 24 टक्‍क्‍यांवर आल्याने दुष्काळाच्या झळा चांगल्याच तीव्र होताना दिसत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात अचानक झालेल्या तापमान वाढीचा धरणातील पाणीसाठ्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. तापमान वाढीच्या झळा संपूर्ण देशासह महाराष्ट्रालाही बसत आहेत. सातारा जिल्ह्याचा पश्‍चिम भाग हा जास्त पर्जन्यमान असणारा भाग म्हणून ओळखला जातो. परंतु, गेल्या दोन वर्षात या अतिवृष्टीच्या परिसरातसुध्दा सरासरीच्या मानाने पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धोम धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. बलकवडी धरणातील संपूर्ण पाणी फलटण-खंडाळा तालुक्‍याला जाते. बलकवडी धरणावर जल्लक्ष्मी योजना कार्यान्वित आहे. पण त्या योजनेचा 100 फायदा या भागातील शेतकऱ्यांना होताना दिसत नाही.

ही योजना सुरु झाल्यापासून पूर्णपणे लिकेज निघून व्यवस्थित चालत नसल्याने शेतकऱ्यांना उन्हाळ्यातील पिकांसाठी शापच ठरत आहे. त्यामुळे वाईसह पाच तालुक्‍यांचा भार हा धोम धरणावर येवून पडतो. धोम-बलकवडी पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ नियोजनामुळे ऐन उन्हाळ्यात दरवर्षी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असते. वाई तालुक्‍यात असणाऱ्या धोम धरणात फक्त 24 टक्के पाणीसाठा उरलेला आहे. हा उरलेला पाणीसाठा पिण्यासाठी शिल्लक ठेवल्याचे संबधित विभागाकडून सांगण्यात आले आहे.

वाई तालुक्‍याची जीवनधारा म्हणून ज्या धरणाकडे पहिले जाते त्याच धोम धरणात चाळीस टक्के गाळ भरलेला आहे. ही आतिशय गंभीर बाब असून धोम पाटबंधारे खात्याने चालढकल केल्याने धरणात पाणी कमी आणि गाळच जास्त आहे. मे महिन्याच्या शेवटच्या पंधरावड्यात बऱ्यापैकी धरणातील पाणी खाली झाल्यावर परिसरातील शेतकऱ्यांना या वीट भट्टीच्या ठेकेदारांना आवाहन केल्यास धरणात पाटीभर गाळ शिल्लक राहणार नाही, परंतु धोम पाटबंधारे खात्याच्या वेळकाढूपणामुळे व गलथान नियोजनामुळे वाई तालुक्‍यासह ज्या तालुक्‍यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न या धरणावर अवलंबून आहे. त्या तालुक्‍यांना याची जास्त झळ दरवर्षी बसत आहे. धोमधरण मे मध्ये काही प्रमाणात खाली होत असले तरीही जूनपर्यंत पाणीसाठा पुरेल एवढे नियोजन संबंधित विभागाकडून होण्याची नितांत गरज आहे. सध्या धरणात जे पाणी शिल्लक ते जून अखेर पुरू शकेल. परंतु दरवर्षी प्रमाणे पावसाने ओढ दिल्यास पाच तालुक्‍यांना शेतीच्या पाण्याचे दुर्भिक्ष नक्कीच जाणवू शकते.

पिण्याच्या पाण्यासाठी चालू असलेल्या पाण्याच्या स्कीम धोक्‍यात येवू शकतात. वाई तालुक्‍यातही या वर्षी तापमानाची भीषणता एप्रिल मध्येच जाणवू लागली आहे. तालुक्‍यातील कवठेसह काही गावांनी जलशिवार योजनेचे काम प्रभावीपणे राबविल्याने काही अंशी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला असला. तरीही इतरही गावांमधून पाण्याची समस्या कमी झालेली नाही. धोम धरणातील पाण्याची क्षमता कमी होत चालली असल्याने धोम धरणाचे भवितव्य पावसावरच अवलंबून आहे. वाईच्या पश्‍चिम भागात पाणी उषाशी असताना कोरड मात्र घशाला पडलेली असते. पाणी समोर असताना स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून दुसऱ्याचे संसार फुलविण्यात धन्यता मानली त्या लाभार्थ्यांना धरणातील पाणी उचलण्याचा अधिकारच नाही. पाण्यासाठी काही किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

मुबलक पाणी असणाऱ्या भागातच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असते. पावसात पडणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने उन्हाळ्यात त्याच्या झळा दरवर्षी बसतात. कोणत्याही विभागाकडून कायम स्वरुपीचे काम या दुर्गम होत नसल्याने पर्यटन वाढीसाठी संधी उपलब्ध असताना या भागातील तरुण मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहराकडे धाव घेताना दिसतो, हे दुर्दैव म्हणावे लागेल. बलकवडी धरणातील फलटणला जाणाऱ्या पाण्याला अनेक गावांसह खंडाळा तालुक्‍याचा विरोध आहे. पाण्यावरूनच भीषण आंदोलने होणार, अशी परिस्थिती निर्माण होवू शकते. हे सर्व रोखावयाचे झाल्यास पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना प्रभावीपणे राबविणे आज काळाची गरज आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.