डॉ. संदीप लेले यांचा अपघाती मृत्यू

सायकलिंग करताना ट्रकला बसली धडक 

सातारा –  येथील दातांचे प्रसिद्ध डॉक्‍टर व उत्कृष्ठ धावपटू संदीप शिवराम लेले (वय 48) यांचे शनिवारी सकाळी आठच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील तेजस डेअरी नजीक महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने अपघाती मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी, डॉ. संदीप लेले यांना सायकलिंगची आवड होती. शनिवारी पहाटे 5 वाजता ते मित्र पंकज नागोरी, तुषार लोया यांच्यासमवेत भुईंज येथे सायकलिंगसाठी गेले होते. तुषार लोया हे लिंबखिंड येथून माघारी फिरले तर नागोरी व डॉ. लेले हे भुईंजपर्यंत सायकलिंग करण्यास गेले. तेथून परत साताऱ्याला येत असताना गौरीशंकर कॉलेजनजीक असलेल्या तेजस डेअरीनजीक आले असताना त्यांच्यासोबत असलेल्या पंकज नागोरी यांना समोर बंद स्थितीत उभा असलेला ट्रक दिसला, मात्र डॉ. लेले हे मान खाली घालून सायकल चालवत असल्याने तो ट्रक त्यांना दिसला नाही. त्यामुळे त्यांच्या सायकलने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले.

दरम्यान, सायकलिंग करत असलेल्या नागोरी यांनी तातडीने मोबाईलवरुन हे वृत्त साताऱ्यात कळवले. अधिक उपचारासाठी त्यांना ऍम्ब्युलन्समधून यशवंत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र, याठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर डॉ. लेले यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.