वेतनवाढ कराराची कोंडी कायम

अद्यापही तोडगा नाही : एस.टी. कामगारांमध्ये संताप

पुणे – राज्यभरातील एस.टी. कामगारांच्या वेतनवाढीचा करार रखडला जाण्याची शक्‍यता आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या 4 हजार 849 रुपयांचा वेतनवाढीच्या कराराची कोंडी अद्यापही कायम आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी करार होण्याची अपेक्षा राज्यभरातील एस.टी. कामगार संघटनांनी व्यक्‍त केली आहे.

एस.टी. कामगारांच्या 2020 पर्यंतच्या वेतनवाढ करारावर अद्याप तोडगा निघालेला नाही. यासाठी मंजूर झालेली 4,849 कोटी रुपयांची वेतनवाढ पूर्णत: द्यावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. मात्र, वेतनवाढ करारावर अद्यापही तोडगा निघाला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. यासंदर्भात राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नुकतीच मुंबईतीत महामंडळाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यासमवेत बैठक घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्यापही वेतनवाढीचा प्रश्‍नावर तोडगा निघाला नसल्याचे दिसत आहे.

एस.टी. कामगारांच्या वेतनवाढीच्या कराराबरोबर “ईटीआय’च्या अपुऱ्या मशीन, निरुपयोगी स्मार्ट कार्ड, राज्यभरातील आगारामधील विश्रांतीगृहाची दुरवस्था, अधिकाऱ्यांची दडपशाही, चालक-वाहक ड्यूटी विना यासारख्या अडचणी सोडविण्याची मागणी संघटनांनी केली आहे.

अद्याप एकही बैठक नाही
वेतनवाढीच्या कराराचा निर्णय एकतर्फी असल्याने संघटनांनी करारावर सह्या केलेल्या नाहीत. याबाबत न्यायालयाने महिनाभरात 3 बैठका घेण्याचे आदेश देऊनही अद्यापही बैठका झालेल्या नाहीत. यामुळे संबंधित न्यायालयाचाही अपमान करत असल्याचे, अनेक संघटनांचे म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.