आता मतदारांनी यात्रा काढावी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपची महाजनादेश यात्रा आता शेवटच्या टप्प्यात आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या यात्रेचा समारोप होणार आहे. दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनसंवाद यात्राही अखेरच्या टप्प्यात आहे. शिवसेनेच्याच आदेश बांदेकर यांची माऊली संवाद यात्राही आता लवकरच निरोप घेईल. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रा नुकतीच संपली. विदर्भातील कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी नियोजन केलेली कॉंग्रेसची पोलखोल यात्रा अंतर्गत कलहामुळे निघू शकली नाही अन्यथा ती यात्राही आता संपली असती. थोडक्‍यात काय कोणत्या यात्रेच्या नावाखाली राजकीय नेत्यांनी गेल्या काही दिवसांत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे.

सत्ताधाऱ्यांच्या यात्रेत अपेक्षेप्रमाणे भरघोस आश्‍वासने देण्यात आली आणि सरकारने केलेल्या कामाचा पाढा वाचण्यात आला, तर विरोधकांच्या यात्रेत सरकारवर टीका करून आम्हालाच सत्ता द्या अशी याचना करण्यात आली. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अशा प्रकारचा दिखावा आवश्‍यक असल्याने राजकीय पक्षांनी हे यात्रांचे कर्मकांड पार पाडले आहे; पण या सर्व यात्रा निघून गेल्यांनंतर सर्वसामान्य मतदारांच्या हाती काय पडले हा संशोधनाचा मुद्दा ठरावा. या यात्रांच्या निमित्ताने निर्माण झालेला बॅनरबाजी आणि झेंड्यांचा कचराच आता फक्‍त या मतदारांच्या साक्षीला उरला आहे. त्याशिवाय मतदारांचा वैचारिक गोंधळ उडाला आहे तो वेगळाच.

या सर्व यात्रांची सोशल मीडियावर उडवली जाणारी खिल्ली पाहता आता सर्वसामान्य मतदारांनीही आपली एक यात्रा काढावी असे वाटते. सोशल मीडियावर सक्रिय होणाऱ्यांनी आता रस्त्यांवरही उतरायला हवे. कारण मंदी, महागाई, बेरोजगारी आणि सामाजिक अस्वस्थता यामुळे दबून आणि चेपून गेलेल्या मतदाराला नक्‍की काय हवे याची कल्पना झगमगाटी यात्रा काढणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना नसेल तर आता मतदारांनी स्वतःचा अजेंडा घेऊन आपली मागणी यात्रा अथवा अपेक्षा यात्रा काढायला हवी. सर्वसामान्यांच्या अगदी क्षुल्लक गरजाही पूर्ण होत नसतील तर यात्रा काढण्याशिवाय अन्य पर्याय नाही. खड्डेमुक्‍त रस्ते ही साधी गरजही पूर्ण होऊ शकत नाही.

मराठी मनोरंजन सृष्टीतील काही कलाकारांनी रस्त्यांतील खड्ड्यांबाबत सोशल मीडियावर व्यक्‍त केलेली परखड मते पाहता आता सर्वसामान्य मतदारांनी आपल्या मागण्या आणि अपेक्षा घेऊन रस्त्यावर उतरण्याची गरज अधिकच अधोरेखित होत आहे. “स्मार्ट सिटी’च्या वल्गना करत मोफत वायफायसारख्या सुविधा देण्याच्या घोषणा करणाऱ्या मुंबई, ठाणे आणि राज्यातील अनेक शहरांतील रस्त्यांची अवस्था वाईट असल्याने अशा खड्डेमय रस्त्यांवरून दररोज प्रवास करणारे सर्वसामान्य मिळेल त्या माध्यमातून आपल्या वेदना मांडत असतात. आता मराठी चित्रपट-नाट्यसृष्टीतील कलाकारांनीही यात आपला आवाज सामील केला आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव, चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी यांच्यासह अनेक कलाकारांनी शहरांतील रस्त्यांच्या परिस्थितीबाबत समाजमाध्यमांवरून तिखट प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या आहेत.खड्डे हे एक प्रातिनिधिक उदाहरण मानावे लागेल.

राजकीय नेत्यांच्या विशेषतः सत्ताधारी नेत्यांच्या यात्रा ज्याठिकाणी जातात त्याठिकाणच्या रस्त्यांची तात्पुरती डागडुजी केली जाते त्यामुळे सत्ताधाऱ्यांना रस्त्याचे दुखणे कधीच लक्षात येत नाही. या यात्रा वातानुकूलित मोठ्या वाहनांमधून होत असतात; पण याच महाराष्ट्रात सर्वसामान्य लोक ज्या एसटी बसमधून प्रवास करतात त्या बसची अवस्था काय झाली आहे याची दखल कोणाला घ्यावी वाटत नाही. परभणी एसटी डेपोमधील एक अत्यंत मोडकळीस आलेली बस धोकादायक पद्धतीने रस्त्यावरून प्रवाशांना घेऊन कशी धावत होती याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. राजकीय नेते आपल्या यात्रांमध्ये मिनरल वॉटरशिवाय अन्य कोणतेही पाणी प्राशन करीत नसताना राज्याच्या अनेक भागांत लोकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे.

यात्राकाळात होणाऱ्या सभांसाठी मैदाने तयार करताना पाण्यावर आणि इतर गोष्टींवर लाखो रुपये खर्च होत असताना दुष्काळी भागात जनावरांनाही पाणी मिळत नाही अशी स्थिती आहे. व्यासपीठावर मोठमोठ्या घोषणा दिल्या जात असताना बेरोजगार, पिचलेला तरुण मात्र उद्याचा दिवस कसा काढायचा या चिंतेत आहे. सर्वसामान्य छोटा दुकानदार आणि उद्योजकही उलाढाल ठप्प झाली असल्याने ऐन उत्सवाच्या काळात अस्वस्थ आहे. त्याच्या दुकानावरून अनेक यात्रा आल्या आणि गेल्या पण त्याचा त्याला काहीच फायदा झाला नाही. आपल्या यात्रांना चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल राजकीय पक्षांचे नेते स्वतःची पाठ थोपटून घेत असले तरी यात्रेच्या गर्दीत कोणत्यातरी कोपऱ्यात बसलेल्या सर्वसामान्य माणसाची वेदना त्यांना समजून घेता आली नाही हे वास्तव आहे. म्हणूनच आता कोणत्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर न घेता मतदारांनी आपल्या मागण्यांसाठी यात्रा काढण्याची वेळ आली आहे.

येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल. ही घोषणा झाली की आचारसंहिता लागू होईल त्यानंतर आचारसंहितेच्या नावाखाली सत्ताधारी कोणतेही काम करणार नाहीत किंवा कोणतीही घोषणा करणार नाहीत म्हणजेच नवे सरकार सत्तेवर येईपर्यंत खड्डे, दुष्काळ आणि अस्वस्थता कायम राहणार आहे. आपल्या लोकशाहीत दर निवडणुकीत राजकीय पक्षांचा जाहीरनामा प्रसिद्ध होतो. पाच वर्षांनी तीच तीच आश्‍वासने जाहीरनाम्यात पुनःपुन्हा दिसतात त्यामुळे आता मतदारांनी स्वतःचा जाहीरनामा तयार करून तो राजकीय पक्षांना सादर करण्याची गरज आहे. आम्हाला चांगले रस्ते हवे आहेत.

वातानुकूलित बुलेट ट्रेन नको आहे हे राजकीय पक्षांना कोणीतरी समजावून सांगण्याची गरज आहे. विकास म्हणजे नक्‍की काय याची कल्पना नसल्याने दिखाऊ गोष्टींवर भर देणाऱ्या सत्ताधाऱ्यांना मतदारांनी आपल्या निश्‍चित गरजा दाखवून देण्याची हीच वेळ आहे. गावात बुलेट ट्रेन आली; पण या ट्रेनमधून प्रवास करायला खिशात पैसाच नसेल तर ती बुलेट ट्रेन काय कामाची हे समजून घ्यायला हवे. राजकीय नेत्यांना प्राधान्य समजत नसेल तर मतदारांनी आपल्या यात्रेच्या माध्यमातून हे प्राधान्य समजावून देण्याची हीच वेळ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.