उत्तर भारतीयांचा अपमान केल्याचा आरोप
मुझफ्फरपूर : एका वक्तव्यावरून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते संतोष गंगवार यांच्या अडचणी तूर्त संपण्याची चिन्हे नाहीत. आता त्यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केल्याचा आरोप करणारी एक याचिका बिहारमधील न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
गंगवार लोकसभेत उत्तर प्रदेशातील बरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्या मतदारसंघात शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना गंगवार यांनी केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले. भारतात सध्या रोजगारांची कमी नाही. मात्र, ते रोजगार प्राप्त करण्यासाठी योग्यता असलेल्या उत्तर भारतीयांची कमी आहे, असे त्यांनी म्हटले. त्यावरून ते मोठ्या टीकेचे धनी ठरले. चौफेर टीकेनंतर गंगवार यांनी सारवासारवही केली. तरुणांमध्ये आवश्यक कौशल्यांचा अभाव आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने कौशल्य विकास मंत्रालय स्थापन केले असल्याकडे मला लक्ष वेधायचे होते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र, त्यावरून उत्तर भारतीयांचे समाधान झालेले दिसत नाही. त्यामुळेच बिहारमधील न्यायालयात गंगवार यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर 25 सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.