साहित्य चोरी होत असतानाही, थांबे बसविणे सुरूच
पुणे – महापालिकेकडून लाखोंची उधळपट्टी करून शहरात बसविलेल्या स्मार्ट बसस्टॉपमधील टीव्ही, सीसीटीव्ही, तसेच इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरीस जात असतानाही आमदार तसेच नगरसेवकांच्या निधीतून पुन्हा असे बसस्टॉप उभारल्याचे समोर आले आहे. सिंहगड रस्त्यावर आणखी 10 ते 15 ठिकाणी असे बसस्टॉप बसविण्यात येत आहेत. तर त्या पेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ठिकाणी स्टेनलेस स्टिलचे बसथांबे आहेत अशा ठिकाणीच हे स्मार्ट बसस्टॉप उभारण्यात येत आहेत.
नगरसेवकांकडून वॉर्डस्तरीय निधी तसेच आमदारांकडून आमदार निधीतून शहरात स्टेनलेस स्टिल तसेच वेगवेगळ्या स्वरुपाचे बसथांबे उभारले जातात. त्यासाठी दरवर्षी पुणेकरांच्या कराच्या रकमेतून लाखोंची उधळपट्टी केली जात आहे. महापालिकेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत शहरात 20 ते 25 स्मार्ट बसथांबे उभारले होते. त्या ठिकाणी मोफत वाय-फाय, सीसीटीव्ही, डिस्प्ले टिव्ही तसेच इतर अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध होत्या. मात्र, अवघ्या काही दिवसांत या महागड्या बसथांब्यांमधील वस्तूंवर भुराट्या चोरांनी ताव मारला असून या वस्तू लंपास केल्या आहेत. त्याची साधी पोलीस तक्रारही महापालिकेने दिली नाही. अशी स्थिती असतानाच पालिकेकडून पुन्हा एकदा आमदार तसेच नगरसेवक निधी खर्ची पाडण्यासाठी स्मार्ट बसथांबे उभारत आहेत.
छत असलेले बसथांबे हवे आहेत. नागरिकांना उन्हाळा, पावसाळ्यात रस्त्यावरच थांबावे लागते. त्यामुळे प्रवाशांना चांगला दर्जा असलेले बसथांबे उभारावेत. ते स्मार्ट नसतील तरीही चालतीत पण लाखोंची उधळपट्टी करू नये. हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे आधी मंजूर आहेत तेवढे बसथांबे उभारावेत नंतर लोकप्रतिनिधींच्या मनासारखे बसथांबे द्यावेत.
– संजय शितोळे, सीटीआय संस्था