शैक्षणिक वर्ष संपताना साहित्य खरेदीचा घाट
पुणे – शाळांचे शैक्षणिक वर्ष संपण्यास अवघे दोन महिने शिल्लक असताना महापालिका प्रशासनाचा शिक्षण विभाग जागा झाला आहे. महापालिका शाळांमध्ये गणिताची आवड निर्मिती, प्रयोगशाळांसाठी साहित्य, क्रीडा साहित्य, तसेच बेंचेस आणि शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी शैक्षणिक साहित्य खरेदीचा घाट या विभागाकडून घातला जात आहे.
त्यासाठीची निविदा प्रक्रिया मध्यवर्ती भांडार विभागाने राबविली असून तब्बल 60 ते 70 लाख रुपयांच्या साहित्य खरेदीच्या निविदा नुकत्याच काढण्यात आल्या आहेत. तर या निविदांना 30 दिवसांचा कालावधी दिला असून केवळ मार्च अखेर निधी संपविण्याचा उद्योग करण्यासाठी हा घाट घातल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शाळांची जबाबदारी काही वर्षांपूर्वी शिक्षण मंडळाकडे देण्यात आली होती. मात्र, शिक्षण मंडळ भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याने त्यात न्यायालयानेच हस्तक्षेप करत ही मंडळे बरखास्त करून त्याचा कारभार आयुक्तांच्या हातात दिला आहे. मात्र, त्यानंतर शिक्षण मंडळाचे नाव शिक्षण विभाग करत आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी पालिकेवर आली असली तरी, या विभागाचा कारभार बदलण्याची चिन्हे नसल्याचे पुन्हा समोर आले आहे.
शिक्षण विभागाच्या मागणीनुसार, पालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून गणिताचे साहित्य, विज्ञान विषयक साहित्य, बेंचेस, प्रयोगशाळा साहित्य खरेदीच्या जवळपास सात निविदा काढल्या असून त्याची रक्कम 60 ते 65 लाखांची आहे. प्रभाग 11, 34 तसेच 15 मधील शाळांसाठी हे साहित्य वापरले जाणार आहे.
मुलांची नव्हे.. मार्च एडिंगची काळजी
शिक्षण विभागाकडून या निविदांना 30 दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे हे साहित्य प्राप्त झाले तरी मार्च उजाडणार आहे. तर मुलांच्या वार्षिक परीक्षा मार्च अखेरीस आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात असतात. त्यामुळे हे शैक्षणिक साहित्य वापरले जाणार का हाच मोठा प्रश्न आहे. मात्र, त्याचवेळी शैक्षणिक आवडींच्या नावाखाली या खर्चाची उधळपट्टी होणार असली तरी, प्रत्यक्षात अंदाजपत्रकातील निधी 31 मार्चपूर्वी संपविण्यासाठीचा हा घाट घालण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे.