वॉशिंग्टन: अमेरिकेच्या नौदलातील थिओडोर रुझवेल्ट या विमानवाहू नौकेवरील करोनाग्रस्तांची संख्या 550 झाली आहे. अमेरिकेच्या नौदलाच्यावतीने शनिवारी ही माहिती देण्यात आली. या विमानवाहू नौकेवरील 92 टक्के कर्मचाऱ्यांची करोनासाठीची चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी 550 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, तर 3,673 जणांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. या निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या खलाशांना किनाऱ्यावर सोडण्यात आले आहे, असे शिन्हुआ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
या जहाजावरील कॅप्टन ब्रेट क्रोझियरना जहाजावर करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याची शंका आली. त्यानंतर सर्व खलाशांची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी केवळ डझनभर खलाशांची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आता दोन आठवड्यांनंतर या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 550 पर्यंत पोहोचली अहे.
हा धोक्याचा इशारा दिल्याबद्दल क्रोझियर यांना तत्कालिन प्रभारी नौदलप्रमुख थॉमस मॉडली यांनी तात्काल पदमुक्त केले होते. मात्र त्यांच्या या कारवाईवर जोरदार टीका झाल्यामुळे मॉडली यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
क्रॉझियर यांना पुन्हा सेवेत घेण्याबाबतचा निर्णय चौकशी पूर्ण झाल्याशिवाय होऊ शकणार नाही, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क ईस्पर यांनी म्हटले आहे.