सोलापूर – पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे येथे शुक्रवारी दुपारी एका विवाहित महिलेसह दोघेजण भीमा नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे. पायल सुग्रीव लोंढे (वय 18) आणि जय जाधव अशी नदीत वाहून गेलेल्या दोघांची नावे आहेत.
पायल ही कपडे धुण्यासाठी नदीवर गेली होती. कपडे धुण्याचे झाल्यानंतर पायल आणि जय पोहण्यासाठी नदीत उतरले होते. मात्र पाण्याचा मोठा वेग असल्याने दोघेही वाहून जाऊन बेपत्ता झाले आहेत. याची माहिती मिळताच तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक युवकांच्या मदतीने दोघांचा शोध घेण्यात आला. मात्र तपास न लागल्याने अखेर स्पीड बोट मागवून पाण्यात वाहून गेलेल्यांच्या शोध सुरु करण्यात आला आहे.