पिंपरी – देशभरातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध करुन देण्यासाठी एचए कंपनीमध्ये आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर व अन्य खर्चाकरिता पिंपरी-चिंचवड महापालिकेने 25 कोटी रुपये आर्थिक मदत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रसायन राज्यमंत्री मनसुख मांडविया व संसद समन्वयक एचके हजोन यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करण्यात आली. ही सकारात्मक चर्चा झाल्याने, एचएमधील लसनिर्मितीला वेग मिळण्याची शक्यता आहे.
पिंपरीतील हिंदुस्थान अँटीबायोटिक्स कंपनीत कोविड लस, रेमडेसिव्हिर आणि ब्लॅक फंगस औषध निर्मिती करण्यासाठी हिंदुस्थान अँटीबायोटिक्स लि. चे अध्यक्ष खासदार मनोज कोटक व व्यवस्थापकीय संचालिका नीरजा सराफ यांच्यासमवेत शुक्रवारी (दि.28) पुण्यात बैठक झाली. शहराच्या वतीने या बैठकीला आमदार महेश लांडगे उपस्थित होते.
आम्ही लसनिर्मिती प्रस्तावासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा पाठपुरावा करू आणि याच्या अंमलबजावणीने सर्व नागरिकांना त्वरित दिलासा मिळेल, असे आश्वासन या बैठकीत देण्यात आले. कोविड प्रतिबंधक लस निर्मितीकरिता एचए कंपनी प्रशासनाने यापुर्वीच प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला आहे. एचएची आर्थिक स्थिती लक्षात घेता, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कंपनीला 25 कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला मान्यतादेखील दिली आहे.
शहरातील सर्व राजकीय नेते एचएमधील लसनिर्मितीकरिता आग्रही आहेत. त्याकरिता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती केली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात पार पडलेल्या बैठकीला व थेट केंद्रीय रसायन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याशी दुरध्वनीहून झालेल्या चर्चेला महत्व प्राप्त झाले आहे.