नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील मुसळधार पावसामुळे इथल्या नदी-नाल्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे जम्मू-कश्मीरमधील पुंछमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पावसामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नदीचा प्रवाह ओलांडताना भारतीय लष्कराचे दोन जवान वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये पेट्रोलिंग दरम्यान ओसंडून वाहणारी नदी पार करण्याच्या प्रयत्नात नायब सुभेदारसह दोन जवान वाहून गेले आहेत.
अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती देताना, ‘शनिवारी दोन जवान पुंछ परिसरात गस्त घालत असताना दुथडी भरून वाहणारी नदी ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना जोरदार प्रवाहाच्या तडाख्यात आल्याने दोन जवान वाहून गेले आहेत. भारतीय लष्कराचे दोन जवान नदीत वाहून गेल्याने जम्मू आणि काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील मुगल रोडलगत पोशाना भागात बचाव आणि शोध मोहीम सुरू असल्याचे म्हटले आहे.
वाहून गेलेल्या दोन जवानांपैकी एकाचं नाव नायब सुभेदार कुलदीप सिंह असं आहे. अन्य जवानाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. सुरक्षा दल आणि आपत्ती व्यवस्थापन दल यांच्याकडून शोध आणि बचाव मोहिस सुरु आहे. कारवाईचे निरीक्षण करण्यासाठी आणि आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी वरिष्ठ लष्कर आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाची संततधार सुरुच आहे. खराब हवामानामुळे सलग तिसऱ्या दिवशी पवित्र अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. श्रीनगरमध्ये संततधार पावसामुळे झेलम नदीच्या पाण्याच्या पातळीने धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. घरांमध्ये पाणी शिरू लागले आहे. स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.