- 31 रुग्णांचा मृत्यू
- 175 करोनामुक्त
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांनी आज पुन्हा पाचशेचा टप्पा ओलांडला. तर अनेक दिवसांनंतर बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. आज शहरामध्ये नवीन 520 नवीन रुग्णांची भर पडली. 175 रुग्ण करोनामुक्त झाले. तसेच 31 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शुक्रवारी (दि. 28) शहरात 520 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील 2 लाख 49 हजार 276 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 31 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 19 व शहराबाहेरील 12 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरातील व शहराबाहेरील 5996 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरामध्ये 175 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 40 हजार 46 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 5939 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 2979 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 2243 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 5222 इतकी आहे.
जिल्हा रुग्णालयात तिघे बाधित
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी (दि. 28) तीन रुग्ण करोनाबाधित आढळले. तर, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. बाधित रुग्णांमध्ये सहा वर्षाच्या मुलासह प्रत्येकी एक पुरुष व महिला रुग्णांचा समावेश आहे. बोपोडी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मंचर, केसनंद वाघोली, औंध, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, घोरपडे येथील 9 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामध्ये 7 पुरूष तर, 2 महिला रुग्णांचा समावेश आहे. रुग्णालयात सध्या 36 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 26 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत एकूण 1 हजार 331 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 352 रुग्णांना उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविले आहे. 2 हजार 45 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.