राजगुरूनगर (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील एका गावात मुंबईतील रेड झोनमधून आलेल्या एका कुटुंबातील दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना राजगुरूनगर येथील वसतिगृहात संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
देशात करोना विषाणू संसर्ग वाढत आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली आहे. खेड तालुक्यात अद्यापपर्यंत एकही करोनाबाधित रुग्ण सापडला नाही. याबाबत प्रशासनाने खबरदारी घेतली आहे तर नागरिकांनीही काळजी घेतली आहे. मात्र, भविष्यात असे घडू नये, यासाठी प्रशासन प्रभावी उपाययोजना राबवत आहे. लॉकडाऊनच्या काळात बाहरेगावच्या लोकांना तालुक्यात प्रवेश नाही तर तालुक्यातील नागरिकांनाही बाहेर जाण्यास परवानगी नाही. त्यातच रेड झोन असलेल्या मुंबई आणि पुणे, पिंपरी-चिंचवड आदी भागातील नागरिकांना सक्त मनाई केली आहे. तरीही तालुक्यात प्रशासनाला चकवा देत अनेकजण मुंबई-पुणे येथून येण्याचे प्रयत्न करीत आहेत. काही गावांमध्ये ते आलेही आहेत. त्यांची माहिती स्थानिक ग्रामपंचायत व प्रशासनाकडे दिली जात नसल्याचा ते गुन्हा करीत आहेत.
माहिती लपवून ठेवणाऱ्यांचा ग्रामस्थ शोध घेतात. काही जण बळजबरीने गावात प्रवेश करतात, अशा नागरिकांना प्रशासनाने क्वारंटाइन करण्याची भूमिका आता प्रशासनाने घेतली आहे. रेड झोनमधून आलेल्या व्यक्तीवर तात्काळ सरकारी आदेश न पाळल्याप्रकरणी कलम 188 अन्वये कारवाई केली जात असून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येणार आहे.
मुंबई येथील रेड झोनमधील सील केलेल्या बिल्डिंगमधून शासनाला चकवा देऊन दोन व्यक्ती खेड तालुक्यातील एका गावात आल्या आहेत. त्याची माहिती ग्रामस्थांनी तालुका आरोग्य विभाग व पोलिसांना दिली होती, त्याची तात्काळ दखल घेत त्या दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करून त्यांची विलगीकरण कक्षात रवानगी केली आहे.
रेड झोनमधून खेड तालुक्यात येणाऱ्या नागरिकांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन(संस्थात्मक विलगीकरण) केले जाणार आहे. त्यासाठी तालुक्यातील 14 वसतिगृहात सुमारे 1200 नागरिकांची व्यवस्था होईल, असे सुसज्ज इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन कक्षाची निर्मिती केली आहे. आपल्या गावात परिसरात बाहेरगावावरून विशेषतः रेड झोनमधून आलेल्या नागरिकांची माहिती ग्रामस्थांनी तात्काळ प्रशासनाला द्यावी.
– अंकुश राक्षे, सभापती, खेड तालुका पंचायत समिती
संस्थात्मक विलगीकरणाची ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाणार आहे. आपल्या गावात आपल्या सोसायटीत पुणे, मुंबईसह बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांची तात्काळ माहिती प्रशासनाला नागरिकांनी द्यावी, करोना संसर्गावर मात करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
– डॉ. बळीराम गाढवे, आरोग्य अधिकारी, खेड तालुका