एकाही ठेकेदाराकडून मदतीचा हात नाहीच
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून हजारो कोटींचे कामे करून शेकडो कोटींचा मलिदा लाटणारे ठेकेदार शहरावर आलेल्या संकटापासून स्वत:ला दूर ठेवत आहेत. एरव्ही कामांसाठी पालिकेत येरझाऱ्या घालणाऱ्या ठेकेदारांपैकी एकही ठेकेदार मानवतेच्या दृष्टीकोनातून गरिबांसाठी मदतीचा हात देत नसल्याचे दिसून येत आहे. ठेकेदारांच्या या करंटेपणाची चांगलीच चर्चा शहर पातळीवर रंगली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हजारो नोंदणीकृत ठेकेदार आहेत. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या खरेदीची कामे मिळावी यासाठी राजकीय दबाव निर्माण करून करोनाच्या टाळूवरील लोणी लाटण्यात मागेपुढे न पाहणारा एकही ठेकेदार गरीब, गरजूंच्या अथवा प्रशासकीय यंत्रणांच्या मदतीसाठी पुढे आलेला नाही. महापालिकेचे सहा हजार कोटींहून अधिक रक्कमेचे बजेट आहे. दरवर्षी स्थापत्य, पाणीपुरवठा, उद्यान, बीआरटीएस, भांडार, वैद्यकीयसह पालिकेच्या अनेक विभागाकडून हजारो कोटींची कामे केली जातात.
दबाव, राजकीय वरदहस्त, टक्केवारीच्या माध्यमातून हे ठेकेदार कामे मिळवून कोट्यवधी रुपये कमाविता. वर्षानुवर्षे लूट करून गब्बर झालेले ठेकेदार शहरावरील संकटकाळात मात्र दूर राहिले आहेत. सामाजिक भावनेतून गोरगरीब जनतेला अन्नधान्य, जेवण, जिवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक संस्था पै-पै गोळा करून मदतीला धावत असताना करोडोंचे धनी झालेले ठेकेदार मात्र या काळात “मूग गिळून गप्प’ आहेत. आयुक्तांसह राजकीय नेत्यांनी आवाहन केल्यानंतर अद्यापही कोणी पुढे आलेला नाही. गेल्या महिनाभरापासून शहरावर संकट असताना माणुकीच्या भावना विसरलेले आणि करंटे बनलेल्या ठेकेदारांना यापुढे पालिकेपासून दूर ठेवण्याची गरज निर्माण झाल्याची भावना अनेकजण व्यक्त करीत आहेत.
बिल्डरांचे कामगारांकडे दुर्लक्ष
बांधकाम व्यवसायातून गेल्या पंधरा वर्षांत शहरातील अनेक बिल्डर गलेलठ्ठ बनले. वर्षानुवर्षे या बिल्डरांकडे हजारो कामगार काम करत आहेत. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या अडचणीच्या कालावधीत अनेक बिल्डरांनी आपल्या कामगारांकडे दुर्लक्ष केल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. पालिकेने पुढाकार घेऊन या बिल्डरांना धडा शिकवावा आणि त्यांच्या कामगारांच्या किमान दोन वेळच्या जेवणाची तरी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.