शिक्रापूर (वार्ताहर) – येथील मलठण फाटा परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीचा करोनामुळे गुरुवारी (दि. 23) रात्री मृत्यू झाला आहे. तर या मृत व्यक्तीसोबत राहणाऱ्या सासऱ्याला तपासणीसाठी शुक्रवारी (दि. 24) रुग्णालयात नेले असताना त्याने ससून रुग्णालयातून शनिवारी (दि. 25) पलायन केले आहे. दरम्यान, या व्यक्तीची शोधाशोध सुरू असली तरी तो अद्याप सापडलेला नसल्याने नागरिक भयभीत झाले असून प्रशासनाच्या डोक्याला ताप आला आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील मलठण फाटा परिसरात राहणाऱ्या एका 40 वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे ससून रुग्णालयात मृत्यू झाला असताना प्रथम या व्यक्तीसोबत राहणाऱ्या त्याच्या सासऱ्याला खबरदारी म्हणून तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले होते, तर या रुग्णाने आधी उपचार घेतलेल्या शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयातील सहा डॉक्टर व कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आणि सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली; परंतु यावेळी तपासणी पूर्वी मृत व्यक्तीच्या सासऱ्याने ससून रुग्णालयातून पलायन केले, त्यांनतर त्यांचा मोबाइल देखील बंद झाला आहे. त्यांनतर आरोग्य विभाग व प्रशासन चिंतेत आले असून त्यांनी या व्यक्तीची शोधाशोध सुरू केली; परंतु त्याचा मोबाइल बंद आणि त्याचा फोटो देखील उपलब्ध नसल्यामुळे त्याला शोधण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
करोना बाधित असेल तर मोठा धोका
मृत करोनाबाधिताचा सासरा गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असून त्याला करोनाची लागण आहे की नाही हे माहिती नाही. जर ही व्यक्ती करोनाबाधित असेल अन् लवकर सापडली नाही तर या व्यक्तीमुळे करोनाचा संसर्ग आणखी पसरण्याची भीती व्यक्ती होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
शिक्रापूर रुग्णालयातील सर्वांचा अहवाल “निगेटिव्ह’
करोनाबाधिताचा मृत्यू होण्याआधी त्याची तपासणी करणाऱ्या शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयातील सहा डॉक्टर व कर्मचारी व रुग्णवाहिका चालकास क्वारंटाइन करीत त्यांची चाचणी करण्यात आली होती, त्याचा अहवाल रविवारी (दि.26) प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैजनाथ काशीद यांनी दिली. शिक्रापूरकरांसाठी ही दिलासादायक बातमी असली तरी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. संबंधित व्यक्तीने मृत्यू होण्याआधी एका आठवड्यात दोनवेळा शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेतले होते.