सर्वसामान्यांच्या गळ्याला अतिक्रमणाचा फास

ओढे, नाल्यांचे आकुंचन झाल्याने पूर्व हवेलीतील शेकडो कुटुंबे बाधित; प्रशासन निष्क्रिय

सोरतापवाडी – पूर्व हवेली तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये ओढे, नाल्यावरील अतिक्रमणामुळे घरात पावसाचे पाणी शिरले आहे. शेकडो एकर शेती बाधीत झाली. याचा शेतकरी व नागरिकांना फटका बसला आहे. शेतकरी, बिल्डर, कंपन्या व डेव्हलपर्स यांनी ओढे, नाले बुजवलेले आहे. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, पेठ, नायगाव, तरडे, कोरेगावमूळ, उरुळी कांचन, टिळेकरवाडीमध्ये नागरिकीकरण झपाट्याने झाले आहे. जमिनीला सोन्याचा बाजारभाव आला आहे. छोट्या- मोठ्या बिल्डरचे प्रोजेक्‍ट, गुंठेवारी वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला खेटून ओढे, नाले गिळंकृत केले आहेत. शासनाची हजारो एकर जमीन लाटण्यात आली आहे. पण शासनदरबारातून कारवाईचे अस्त्र म्यान करण्यात आले आहे. यातून प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. मागील आठवड्यात पावसाने थैमान घातले होते. ओढ्यावरील अतिक्रमणामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संपूर्ण रात्र त्यांना जागून काढावी लागली.

कदमवाकवस्ती येथे घोरपडेवस्ती, कवडी माळवाडी येथील पवार वस्तीत पाणी शिरले. लोणी काळभोर येथे पावसाने कहरच केला होता. लोणी काळभोर, कुंजीरवाडी, थेऊरच्या सीमेवर असलेल्या बोरकरवस्तीजवळील मोठ्या ओढ्याचे रुपांतर आता पाटात झाले आहे. बेटवस्ती, पाटील वस्ती व गाढवे मळा येथील अनेक घरात पाणी शिरले होते. शेतीचे तळ्यात रुपांतर झाले होते. अनेक शेतकऱ्यांनी ओढ्यावर अतिक्रमण करून आपल्या जमिनी वाढवल्या आहेत.

कदमवाकवस्ती व लोणी काळभोर सीमेवरील ओढा अनेक ठिकाणी भूमिगत करून निसर्गालाच आव्हान दिले आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्यामागील वस्तीत पाणी शिरले होते. कुंजीरवाडी, पेठ, नायगाव, तरडे, टिळेकरवाडी, कोरेगाव मूळ येथे बाजरी व ऊस पाण्याखाली होते. धुमाळमळा, थेऊरफाटा येथे ऊस व भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. डाळिंबाची बाग पाण्यात असल्यामुळे शेतकरी संदीप धुमाळ यांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे.

अतिक्रमणे भोवली; नर्सरीत पाणी शिरले
सोरतापवाडी येथे अनेक नर्सरीमध्ये पाणी शिरल्याने रोपे खराब झाली आहेत. आळंदी म्हातोबाची येथील वनविभागाने चुकीच्या पद्धतीने बांधलेला बंधारा फुटुन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात आठशे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे शेतकरी हरीभाऊ काळभोर यांनी सांगितले. यात कांदा, बाजरी व संपूर्ण शेतीवरील माती वाहून गेली आहे. उरूळी कांचन ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ओढ्याची साफसफाई केली नसल्यामुळे महात्मा गांधी रोड, सायरस पुनावाला शाळा, बाजारपेठ, जय मल्हार रोडवरील घरात व दुकानात पाणी शिरले. रेल्वे पुलाखाली पाणी असल्यामुळे रेल्वेपलीकडील गावांचा उरुळीतील संपर्क तुटला होता. अनेक मोठ्या गावात ठिकठिकाणी ओढ्यात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. आधीच ओढ्यावर अतिक्रमण आणि त्यात कचऱ्याच्या ढिगामुळे पाणी जाण्यासाठी मार्गच निघाला आहे. याला मानवनिर्मित अडथळे कारणीभूत ठरले आहेत. निसर्गाला आव्हान देणाऱ्या नागरिकांनी नैसर्गिक ओढ्याचे प्रवाह बदलले आहेत. त्यामुळे ओढे आकसल्यामुळे संकट ओढवले आहे. मानवाने स्वतःच्या फायद्यासाठी पूरनियंत्रण रेषा ओलांडली आहे.

निसर्गाचे रौद्ररूप कधी थांबणार
पूर्व हवेलीतील लोकांनी निसर्गाविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे पावसाने रौद्ररूप धारण केले. हेच कृत्तीतून दाखवून दिले आहे. शासनाला जाग कधी येणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी व्यक्‍त केला आहे. ग्रामपंचायत विदारक वास्तव निमूटपणपणे सहन करीत आहे. प्रस्थापितांच्या बगलबच्च्यांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे “तेरी भी चूप अन मेरीभी चूप’ अशी अवस्था कारभाऱ्यांची झाली आहे.

ज्यांनी सरकारी जागेतील ओढ्यावर अतिक्रमण केली आहेत. ती अतिक्रमणे काढले जाईल. मंडलाधिकारी व तलाठी यांना पाहणी करून अतिक्रमणाबाबत सविस्तर अहवाल देण्यासाठी सांगितले आहे.
– सुनील कोळी, तहसीलदार, हवेली तालुका.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.