कान्हे (वार्ताहर) – निसर्गरम्य चिखलसे डोंगर परिसरात मद्यपानाच्या पार्ट्या सुरू आहेत. त्याचबरोबर जुगारदेखील खुलेआम खेळला जात आहे. ओल्या पार्टीत सहभागी झालेल्या मद्यपींकडून रिकाम्या बाटल्या फोडून आरडाओरडा करण्याच्या घटनांमुळे स्थानिक रहिवासी हैराण झाले आहेत. या मद्यपींचा बंदोबस्त करण्याची मागणीया परिसरातील नागरिकांनी केली आहे.
चिखलसे हा निसर्गरम्य एकांत परिसर अनेक जुगारी एकत्र जमतात. तर पार्ट्या करण्यासाठी अनेक मद्यपींची टोळकी येत आहेत.सायंकाळ उिशिरापर्यंत त्याठिकाणी गोंधळ सुरू असता. मद्यपानानंतर बेफाम झालेले तरुण चित्रविचित्र आवाज काढत एकमेकांना शिव्या देतात. मोबाईल गाणी मोठ्या आवाजात लावून धांगडधिंगा सुरू असतो.
याठिकाणी माळरान असल्याने या परिसरातील अनेक पशूपालक त्यांची जनावरे याठिकाणी चरायला घेऊन जातात. मात्र, मद्यपींनी केलेला प्लास्टिक पिशव्यांचा कचरा, फोडलेल्या बाटल्यांच्या टोकदार काचा यापासुन जनावरांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
डोंगर परिसरात चिखलसे कुसगाव शिव ही गावे आणि वाड्या-वस्त्यांकडे जाणारा रस्ता आहे. त्यामुळे स्थानिकांची याठिकाणाहून कायम ये-जा सुरू असते. त्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तेथे पार्ट्या करणाऱ्या मद्यपींवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ ांनी केली आहे.