नागरिकांना काहीसा दिलासा : पुणे विभागात मृत्यूचे प्रमाण 3.39 टक्के
पुणे – पुणे विभागात आतापर्यंत सापडलेल्या 40 हजार 242 करोना बाधितांपैकी 24 हजार 400 जण करोनामुक्त झाले आहे. ही संख्या निम्म्याहून अधिक असून, विभागात बरे होण्याचे प्रमाण 60.63 टक्के इतके आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा असला तरी भविष्यात या महामारीचे वाढते संकट कमी करण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्क आणि सॅनिटायझेशन ही त्रिसूत्री अवलंबवावी लागणार आहे. दरम्यान, विभागात करोनामुळे मृत्यू होणाऱ्याचे प्रमाणात 3.39 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
सध्या विभागात (पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर) एकूण 14 हजार 479 बाधित उपचार घेत आहे. त्यातील 693 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. विभागात आतापर्यंत 1 हजार 363 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद पुणे जिल्ह्यात 954 इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येने 33 हजार 607 चा टप्पा पार केला असून, त्यातील 20 हजार 485 बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. 12 हजार 168 बाधितांवर उपचार सुरू असल्याचे विभागीय आयुक्त यांनी सांगितले.
जिल्ह्यात बरे होणाऱ्यांचे प्रमाण 60.95, तर मृत्यूचे प्रमाण 2.84 टक्के इतके आहे. दरम्यान, आजपर्यंत विभागामध्ये एकूण 2 लाख 21 हजार 185 नमूने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 2 लाख 17 हजार 51 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 164 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 76 हजार 440 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 40 हजार 242 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.