काबूल – अफगाणिस्तानमधून इस्लामिक स्टेटला समूळ संपवण्यासाठी तालिबानने एक मोहिम सुरू केली आहे. राजधानी काबूलच्या परिसरात आणि पूर्वेकडे पाकिस्तानच्या सीमेजवळील नांगरहार प्रांतात तालिबानकडून इस्लामिक स्टेटशीसंबंधितांविरोधात ही कारवाई केली जाणार आहे.
अफगाणिस्तानमधील खीमा वृत्तसंस्थेच्या हवाल्याने रशियाच्या स्पुटनिक वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. इस्लामिक स्टेटच्या स्थानिक गटांना पहिल्यांदा लक्ष्य केले जाणार आहे.नांगरहार प्रांताची राजधानी जलालाबोदेत गेल्या तीन आठवड्यांपासून रक्तपात सुरू आहे. तालिबानच्या लष्करी वाहनांना इस्लामिक स्टेटशी संबंधित गटांनी लक्ष्य केले आहे.
भुसुरूंगाच्या सहाय्याने ही वाहने उडवून देण्यात आली आहेत. या हल्ल्यांमध्ये तालिबानचे 3 सदस्य मारले गेले आहेत तर 10 पेक्षा अधिक सामान्य नागरिकही ठार झाले आहेत.
याशिवाय अमेरिकेच्या सैन्याची मागार सुरू असतानाही इस्लामिक स्टेट-खोरसान या संघटनेने काबूल विमानतळावर एक भीषण आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यामध्ये किमान 200 जण ठार झाले होते. अशाप्रकारच्या हल्ल्यांनंतर तालिबानने इस्लामिक स्टेटच्या विरोदात कडक पावले उचलण्याचे ठरवले आहे.