सांगवी, (वार्ताहर) – महिनाभरापूर्वी उद्घाटन झालेल्या ’बाळासाहेब शितोळे जलतरण तलाव’ सुरू होण्याला मुहूर्त मिळाला असून, आज तो सुरू होत आहे. दुरुस्तीच्या नावाखाली सलग तीन वर्षांपासून हा जलतरण तलाव बंद होता. आता हा जलतरण तलाव सुरू होत असल्यामुळे उन्हाळ्यात पोहण्यासाठी सांगवी व परिसरातील नागरिकांना पिंपळे गुरव, बोपोडी, कासारवाडी या ठिकाणी जावे लागणार नाही.
या जलतरण तलावावर महापालिकेच्या वतीने विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सर्व जलतरण तलावांसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग/पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जलतरण तलावाची वेळ स.6 ते स.09.45 व दु.2.30 ते सायं 6.15 अशी आहे. सदर जलतरण तलावासाठी उन्हाळी शिबिर सुविधा स. 10 ते दु. 12 पर्यंत असणार आहे.
या जलतरण तलावावर लहान मुलांसाठी बेबी टँकची देखील सुविधा आहे. जलतरण तलावावर सुरक्षेच्या दृष्टीने मेस्को या संस्थेमार्फत जीवरक्षक तथा सुरक्षा अधिकारी आणि व्यवसथापक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.लिालळपवळर.र्सेीं.ळप या महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळारुन बुकींग करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
मागील तीन उन्हाळ्यांपासून दुरुस्तीच्या नावाखाली जलतरण तलाव बंद होता. आधी कोरोनामुळे बंद होता आणि नंतर नूतनीकरणाच्या नावाखाली कासवाच्या गतीने त्याची दुरुस्ती सुरू होती. महिनाभरापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या जलतरण तलावाचे उद्घाटन झाले होते. मात्र, राहिलेली कामे करण्यासाठी तलाव बंदच ठेवण्यात आला होता. आता नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटू लागल्याने महापालिकेने अखेर गुरुवारी जलतरण तलाव सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.