पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गाच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. कोलकता येथून पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाइन माध्यमातून हे भूमिपूजन केले. तर, पिंपरी चिंचवड शहरातील पीसीएमसी मेट्रोस्थानकावर हा कार्यक्रम झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यातील सहा मेट्रो मार्गाचे उद्घाटन व पिंपरी येथे पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे भूमिपूजन झाले.
एस्प्लानेड मेट्रो स्टेशन कोलकाता येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १५ हजार ४०० कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पांचे ऑनलाइन माध्यमातून उद्घाटन करण्यात आले.
महामेट्रोतर्फे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोच्या दोन मार्गिकांवर काम सुरु आहे. त्यातील काही भाग दोन टप्प्यांत प्रवासी वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला आहे. पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाच्या कामाचे उद्घाटन या वेळी झाले.
पिंपरी स्थानकाजवळील एम्पायर इस्टेट पुलापर्यंत मेट्रो मार्गाचे काम झाले आहे. सध्या तिथे मेट्रो यार्ड आहे. तेथून पुढे मार्ग विस्तारीकरणाचे नियोजन आहे. पिंपरी ते निगडी दरम्यान ४.४ किलोमीटर अंतरावर चिंचवड स्टेशन, महावीर चौक व अहिंसा चौक दरम्यान, आकुर्डीतील खंडोबा माळ चौक,
निगडी – टिळक चौक व भक्ती-शक्ती चौक दरम्यान अशी तीन स्थानके असणार आहेत. या कामासाठी ९१० कोटी १८ लाख रुपये खर्च येणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. हे काम ३९ महिन्यांमध्ये पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे.