सातारा – गणेशोत्सवात भक्तांना खास आकर्षण असते ते बाप्पांच्या आवडीच्या खाद्यपदार्थचे म्हणजेच मोदकाचे. मात्र यंदा बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक तब्बल पाच ते सात रुपयांनी महागले आहेत. खाजगी पोळी भाजी केंद्र व खानावळींकडे उकडीच्या मोदकांना मागणी वाढली असून प्रतिमोदक दहा ते पंधरा रुपये मोजावे लागत आहे.
यादो गोपाळ पेठ, प्रतापगंज पेठ, मल्हार पेठ, कामाटीपुरा आदी भागातील घरगुती खानावळी व महिला बचत गटाकडून उकडीच्या मोदकांची रसद बाप्पांच्या प्रसादासाठी पुरवली जात आहे. तकच्चा माल, करणावळ आणि नारळाच्या चढ्या किंमती यामुळे उकडीचे मोदक पाच ते सात रुपयांनी महागले आहेत. बाप्पांचा मांगल्य उत्सव उतरार्धाकडे निघाला असून घरोघरी पाच दिवसाच्या बाप्पांचे गौरींचे विसर्जन करण्यात आले.
खव्यांच्या रेडिमेड मोदकांबरोबर उकडीच्या मोदकांना चांगलीच मागणी होती. सार्वजनिक मंडळाकडून अकरा एकवीस एकावन्न अशा संख्यांनी उकडीच्या मोदकाची ऑर्डर नोंदवण्यात आली. या पदार्थांसह मजुरी वाहतूक यांचे दर वाढल्याने गेल्या वर्षापेक्षा यंदा उकडीच्या मोदकांचे दर 2 ते 4 रुपयांनी महागले आहेत. मात्र असे असले तरी शहरात सुमार पंचवीस हजार उकडीचे मोदक विकले जातील, असा विश्वास विक्रेते व्यक्त करीत आहेत.
साताऱ्यात सुमारे 50 पेक्षा जास्त भाजी-पोळी केंद्रे असून या केंद्रांवर आताच उकडीच्या मोदकांच्या मागणीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. महिला मोठ्या प्रमाणात नोकरीसाठी घराबाहेर असतात त्यामुळे भाजी पोळीसह उकडीच्या मोदकांना चांगलीत मागणी असते. याबाबत भाजी पोळी केंद्राचे प्रणेते संजय गुजर म्हणाले, प्रत्येक जण उकडीच्या मोदकांची आगाऊ नोंदणी करीत आहेत. साधारणपणे 12-15 रुपये दर असतील मात्र इतर ठिकाणी हे दर जास्त असतील असेही ते म्हणाले. काही बचत गटाच्या प्रमुखांनी सांगितले की मजुरी मोठ्या प्रमाणावर वाढली असून मोदक तयार करण्यासाठी महिला मिळणे अवघड झाले आहे.
त्यामुळे साधारणपणे मोदकांचे दर 12 ते 18 रुपये असणार आहेत. गेल्यावर्षापेक्षा हे दर 2 ते 4 रुपयांनी जास्त असल्याचे त्यानी मान्य केले व इलाज नाही असेही ते म्हणाले. पुढे म्हणाले, उकडिचेच नाही तर इतर सर्व प्रकारच्या मोदकांमध्ये दरवाढ झाली आहे. तळलेले मोदक 20 रुपये नग असा आहे तर आंबा मोदक 600 रुपये किलो, मावा 500 रुपये किलो, कंदी 400 रुपये तर ड्रायफ्रुट 880 रुपये किलो असा असल्याने मोदकाचा गोडवा भलताच महागला आहे.