नगर -आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या अल्पवयीन मुलास सिगारेटचे चटके देत मारहाण केल्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी आरोग्याधिकारी अनिल बोरगे, अग्निशमन विभागाचा प्रमुख शंकर मिसाळसह संशयित अन्य दोन्ही आरोपी अजूनही पोलिसांना सापडलेले नाहीत.
“त्या’ अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवरून मागील महिन्यात 28 जून रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात वरील दोघांसह अग्निशमन विभागाचा कर्मचारी बाळू घाटविसावे व त्या अल्पवयीन मुलाच्या आईच्या विरोधात तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तेव्हापासून ते अधिकारी महापालिकेतही फिरकले नाहीत.
संबंधित अल्पवयीन मुलास 13 जूनला रोजी ही अमानुष मारहाण झाली होती. त्यानंतर त्याच्या तक्रारीची दखल तब्बल 15 दिवसांनंतर घेण्यात आली. त्यानंतर 28 जूनला गुन्हा दाखल करण्यात आला. तत्पूर्वी संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने बोलावून घेतले होते. त्यांची चौकशी देखील करण्यात आली. मात्र, गुन्हा दाखल झाला तेव्हापासूनच हे अधिकारी संपर्काच्या बाहेर असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात येते.
दरम्यान, या तक्रारदार मुलास दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या जुन्या मुख्यालयाजवळ असलेल्या होशिंग हॉस्पिटल परिसरात धमकावण्यात आले. त्याच्या अंगावरील कपडे फाडून त्यास मारहाण केल्याची दुसरी तक्रार कोतवाली पोलिसांत दाखल झाली आहे. या घटनेतील आरोपींचाही अजून ठावठिकाणा लागलेला नाही. तक्रारदार अल्पवयीन मुलगा प्रचंड तणावात आहे. अशावेळी डॉ. बोरगे याची पोलीस दलातील अधिकाऱ्यांशी मैत्री असल्याची चर्चा आहे. सबब, त्याच्या अटकेविषयी देखील संशय व्यक्त होत आहे.
अल्पवयीन मुलास मारहाण केल्याच्या गुन्ह्यातील संशयित चारही आरोपींचा पोलीस कसून तपास करत आहेत. नगर महापालिका, संशयित आरोपींचे राहते घर व त्या घराच्या परिसरात पोलीस पथक विशेष नजर ठेवून आहे. लवकरच सर्व आरोपी अटक होतील.
रवींद्र पिंगळे
सहायक पोलीस निरीक्षक